न्यूयॉर्क : भारतातील सरकारने सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार आणि सरकारवर टीका करणाऱ्या टीकाकारांना वेगवेगळ्या खटल्यांमध्ये गोवलं आणि त्यांना लक्ष्य केलं. तसेच धार्मिक अल्पसंख्यांकावर होणाऱ्या अत्याचाराच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे असं ह्युमन राईट्स वॉचने (Human Rights Watch) आपल्या वर्ल्ड रिपोर्ट 2022 (World Report 2022) मध्ये म्हटलं आहे. कोरोना काळात सरकारकडून अत्यावश्यक आरोग्य सेवांचा पुरवठा न झाल्याने हजारो लोकांना प्राण गमवावा लागल्याचंही या अहवालात नमूद करण्यात आलं आहे. 


आपल्या कट्टर विचारसरणीला विरोध करणाऱ्या विरोधकांना विविध यंत्रणांचा वापर करुन लक्ष्य करण्यात आलं आहे. यामध्ये दहशतवादी विरोधी कायदा, कर संबंधी छापेमारी, आर्थिक अनियमितता कारवाई आणि फॉरेन फंडिंगच्या नावाखाली अशा लोकांना त्रास देण्याचं काम केंद्र सरकारने केल्याचं या अहवालात नमूद केलं आहे. केंद्रातील भाजपप्रणित हिंदू राष्ट्रवादी सरकारच्या कारकीर्दीत धार्मिक अल्पसंख्यांक लोकांवर होणाऱ्या हल्ल्यात मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचंही या अहवालात सांगण्यात आलं असून केंद्र सरकारवर ताशेरे ओढले आहेत. 


ह्युमन राईट्स वॉचच्या या अहवालात सांगण्यात आलं आहे की, देशातील विविध भागात गेल्या काही वर्षांमध्ये मुस्लिम, ख्रिश्चन, दलित आणि आदिवासी लोकांवर होणाऱ्या हल्ल्यांमध्ये वाढ झाली आहे. भाजप सरकारच्या या कारकीर्दीत अल्पसंख्यांकाना असुरक्षितता वाटावी असं वातावरण निर्माण झालं आहे असंही या अहवालात सांगण्यात आलं आहे. 


सिटिझन अमेन्डमेंट बिलला विरोध करणाऱ्या मुस्लिम अल्पसंख्यांक लोकांवरती खोटे खटले भरण्यात आले. तसेच केंद्र सरकारच्या कृषी कायद्यांना विरोध करणाऱ्या शिख समूदायातील लोकांबद्दल धार्मिक आधारावर वेगळा अजेंडा राबवण्यात आल्याचं या अहवालात म्हटलं आहे. केंद्र सरकारला विरोध करणाऱ्या लोकांवर, राजकारण्यांवर सूडबुद्धीने कारवाई करण्यात आली असल्याचं या अहवालात नमूद करण्यात आलं आहे. 


महत्त्वाच्या बातम्या :