मुंबई : देशभरात सध्या वेगवेगळ्या बँकांची मिळून तब्बल दोन लाखांपेक्षा जास्त एटीएम आहेत. सध्या नोटाबंदीमुळे अनेक एटीएम बंद आहेत किंवा सुरु असलेल्या एटीएमपुढे भल्यामोठ्या रांगा आहेत.


काही जीपीएस आधारित किंवा ग्राहक स्वतःहून पुरवत असलेल्या माहितीवरुन, आपल्या परिसरातील एटीएममध्ये कॅश उपलब्ध आहे की नाही, हे सांगणाऱ्या साईटचीही खूप चलती आहे.

वेगवेगळ्या सोशल मीडियावरुन या साईटच्या लिंक फॉरवर्ड होत आहेत. तसंच काही ग्राहक आपापल्या ग्रुपमध्ये तसंच मित्रांनाही कोणत्या एटीएममध्ये कॅश आहे, किती मोठी रांग आहे, याविषयीची माहिती कळवत आहेत.

एटीएम म्हणजे अॅटोमॅटिक टेलर मशिन. पण आपल्याकडे त्याला सोप्या भाषेत एनी टाईम मनी असंही म्हणतात. सुरुवातीला ठीक होतं, पण सध्याच्या नोटाबंदीच्या काळात एटीएम म्हणजे एनी टाईम मनी आहेतच असं नाही.

या एटीएममध्ये पैसे येतात तरी कसे... या प्रश्नाचं अगदी सोपं उत्तर सांगायचं तर जे एटीएम संबंधित बँकेच्या शाखेजवळ असतात, तिथले अधिकारीच त्या एटीएममध्ये कॅश भरतात. तर जे एटीएम ऑफसाईट असतात, तिथे एटीएममध्ये पैसे भरणाऱ्या कंपनीची गाडी येते, तेव्हा त्यात कॅश भरली जाते. पण मुळातच करन्सी नोट प्रेसमधून निघाल्यापासून तुमच्या आमच्या दैनंदिन वापराच्या एटीएमपर्यंत

नोट पोहोचण्याचा प्रवास असतो तरी कसा नेमका....

1. भारतात चलनी नोटा छापण्याचे चार छापखाने आहेत. आपल्या महाराष्ट्रात नाशिकमध्ये त्यापैकी एक छापखाना आहे. त्याशिवाय मध्य प्रदेशातील देवास येथे आणि उर्वरीत दोन कर्नाटकातल्या म्हैसूर आणि पश्चिम बंगालमधल्या साल्बनीमध्ये आहेत. या चार छापखान्यात चलनी नोटांची छपाई होते.

2. या चार ठिकाणी छापलेल्या नोटा रिझर्व्ह बँकेला सुपूर्द केल्या जातात. रिझर्व्ह बँकेचं मुख्यालय मुंबईत असलं तरी देशभरातील चार छापखान्यात तयार झालेल्या नोटा मुंबई मुख्यालयात आणल्या जात नाहीत. तर त्या देशभरात विखुरलेल्या रिझर्व्ह बँकेच्या 40 कार्यालयात पोहचवल्या जातात. या सर्व चलनी नोटा खूप मोठ्या संख्येत असतात, म्हणून मोठमोठ्या कंटेनरमधून त्याची वाहतूक होते.

3. रिझर्व्ह बँकेच्या देशभरातील 40 कार्यालयातून या नोटा बँकाच्या मागणीप्रमाणे बँक करन्सी चेस्टकडे पाठवल्या जातात. रिझर्व्ह बँकेची वाहतूक आणि पुरवठ्याच्या सोईसाठी देशभरात अशी तब्बल 2800 चेस्ट आहेत.

4. रिझर्व बँकेच्या चेस्टमधून ग्राहकांचा नियमित संपर्क असलेल्या बँकाच्या मुख्यालयात किंवा प्रादेशिक मुख्यालयात या नोटा पोहोचवल्या जातात. त्यासाठी रिझर्व बँक सुरक्षा रक्षकांनी सज्ज असलेल्या कॅश इन ट्रान्झिट म्हणजे रोकड वाहतूक करणाऱ्या कंपन्याची मदत घेतं. या कंपन्याच ही रोकड बँकांना पोहचवतात. रिझर्व्ह बँकेच्या प्रत्येक करन्सी चेस्टच्या दिमतीला कॅश इन ट्रांझिट कंपनीच्या जवळपास 20 गाड्या दिमतीला असतात. त्यातून गरजेप्रमाणे रोकड बँकांना पोहोचवली जाते.

5. कॅश इन ट्रांझिट कंपन्याच्या सुरक्षा रक्षकांनी सज्ज असलेल्या व्हॅन एका दिवसात जवळपास 10 ते 15 बँक शाखांना रोकड पुरवठा करतात.

6. याच कॅश इन ट्रांझिट कंपन्या रिझर्व बँकेप्रमाणेच काही बँकानाही सेवा पुरवतात. या रोकड वाहतूक पुरवठा करणाऱ्या कंपन्या बँकाच्या नियोजनाप्रमाणे बँक शाखा तसंच ऑफसाईट म्हणजे शहरात वेगवेगळ्या ठिकाणी असलेल्या एटीएममध्ये कॅश भरतात. जे एटीएम बँक शाखांशी संलग्न असतात, त्यांच्यात कॅश भरण्याची जबाबदारी मात्र बहुतेक ठिकाणी संबंधित शाखेवरच असते.

देशभरातील तब्बल दोन लाख वीस हजार एटीएम पैकी अंदाजे दीड लाख एटीएमला कॅस इन ट्रान्झिट कंपन्या सेवा पुरवतात.