मुंबई : नोटाबंदीचा निर्णय होऊन दहा दिवस उलटले. रांगेतल्या चलन वेदना कमी झालेल्या नाहीत. नोटांची टंचाई नाही, असं अर्थ खातं सांगत असलं तरीही रांग सांशक आहे. नोटा असूनही सगळीकडे पोहोचायला उशीर का होतो, असा प्रश्न रांगेला पडत आहे.
रोजच्या व्यवहारात किती नोटा आहेत, नव्या नोटा यायला किती वेळ लागेल, परिस्थिती कधी सुधारेल या प्रश्नांनी रांगेची अस्वस्थता वाढत आहे. पंतप्रधान मोदींनी 50 दिवस धीर धरायचं आवाहन केलं आहे. मात्र चलन वेदना कमी व्हायला किमान तीन ते चार महिने लागतील असा 'माझा'चा अंदाज आहे.
किमान चार महिने चलन वेदना
एकूण किती नोटा चलनात होत्या?
अंदाजे 9 हजार कोटी नोटा
किती रुपयांच्या किती नोटा?
नोटेची किंमत (रुपये) |
नोटांची एकूण संख्या |
दोन आणि पाच |
1162 कोटी |
दहा |
3200 कोटी |
वीस |
492 कोटी |
पन्नास |
389 कोटी |
शंभर |
1577 कोटी |
पाचशे |
1570 कोटी |
किती नोटा बाद झाल्या?
या 9 हजार कोटींपैकी 25 टक्के वाटा एक हजार आणि पाचशेच्या नोटांचा होता (संदर्भ –
RBI )
चलनबंदीच्या निर्णयामुळे एक हजाराच्या 632 कोटी नोटा तर पाचशेच्या 1570 कोटी नोटा बाद झाल्या. अशा अंदाजे 2300 कोटी नोटा बदलाव्या लागतील.
त्यातच दरवर्षी 1500 कोटी खराब नोटा बाहेर काढल्या जातात त्यात शंभर च्या 500 कोटी, दहा च्या 500 कोटी आणि पाचशेच्या 280 कोटी कोटी नोटा असतात.
या नोटांचं मूल्य किती ?
8 नोव्हेंबरला साडे सोळा लाख कोटी रुपये चलनात होते त्यात एक हजाराच्या नोटांचं मूल्य 6 लाख 32 हजार कोटी तर पाचशेच्या नोटांचं मूल्य 7 लाख 85 हजार कोटी असे दोन्ही मिळून साडे चौदा लाख कोटी रुपये म्हणजेच या दोन बड्या नोटांचा वाटा होता तब्बल 86.4 टक्के.
दोन हजाराच्या किती नोटा छापाव्या लागणार?
एक हजाराच्या सगळ्या 632 कोटी नोटा बदली करायचं ठरवलं तरी दोन हजाराच्या 331 कोटी नोटा छापाव्या लागतील.
कुठे छापतात नोटा?
पश्चिम बंगालच्या सालबोनी आणि कर्नाटक राज्यातल्या म्हैसूरमध्ये भारतीय रिजर्व बँकेचं नोट मुद्रणालय म्हणजेच छापखाना आहे तिथे हे काम सुरु आहे
देशाला लागणाऱ्या चलनापैकी 60 टक्के नोटा या दोन ठिकाणी छापल्या जातात (संदर्भ –BRBNMPL)
यासोबतच मध्यप्रदेशातील देवास आणि आपल्या नाशिकच्या मुद्रणालयात म्हणजेच छापखान्यात 40 टक्के नोटा छापल्या जातात.
नव्या नोटा कधीपासून छापत आहेत?
दोन हजाराच्या नोटा सप्टेंबर- ऑक्टोबरपासून छापणं सुरु आहे. तर पाचशे च्या नोटा छापण्याचं काम याच महिन्यात सुरु झाल्याचं सांगतात.
नोटा छापण्याची क्षमता किती?
सालबोनी, म्हैसुर, देवास आणि नाशिक या चारही ठिकाणी वर्षाला दोन शिफ्टमध्ये अंदाजे 2600 कोटी नोटा छापण्याची क्षमता आहे म्हणजे महिन्याला अंदाजे 200 कोटी नोटा.
मात्र नोटाबंदीची तयारी म्हणून सप्टेंबर ऑक्टोबरपासून दोन ऐवजी तीन शिफ्टमधे काम सुरु आहे, त्यामुळे महिन्याला 300 कोटी नोटा छापणं शक्य आहे.
सध्या रोज किती नोटा छापल्या जात आहेत?
सर्व चारही छापखाने पूर्ण क्षमतेने तीन शिफ्टमधे चालत आहेत, असं गृहित धरलं तरी रोज दहा कोटी नोटा छापल्या जात आहेत.
दोन हजारच्या नोटा सरकारकडे आहेत का ?
चारही मुद्रणालयात दोन हजाराच्या नोटा छपाईचं काम ऑक्टोबरमध्ये सुरु झालं असं गृहीत धरलं तरी एक हजाराच्या सर्व नोटांच्या बदली लागणाऱ्या दोन हजाराच्या 331 कोटी नोटा एव्हाना सरकारच्या खजिन्यात तयार असतील.
पाचशे च्या नोटांची काय स्थिती?
पाचशेच्या नवीन नोटा काही प्रमाणात मिळणं सुरु झालं आहे.
पाचशेच्या जुन्या सगळ्या म्हणजे 1570 कोटी नोटा बदलायच्या आहेत.
चारही छापखाने पूर्ण क्षमतेनं चालले म्हणजे महिन्याला फक्त पाचशेच्याच 300 कोटी नोटा छापल्या तरी सर्व नोटा बदलायला किमान पाच महिने लागतील. जुन्या नोटांइतक्या नोटा सरकार बाजारात आणणार नाही असं गृहित धरलं, यातल्या 80 टक्के छापायचं ठरवलं तरी कमीत कमी चार महिने लागतील.
चलन वेदना किती काळ?
नव्या नोटांना सामावून घेण्यासाठी दररोज 20 हजार एटीएम अपग्रेड केले जातायत, देशातले सर्व सव्वा दोन लाख एटीएम अपग्रेड व्हायला किमान दहा दिवस लागतील म्हणजेच या महिन्याअखेरीपर्यंत सर्व एटीएमवर दोन हजाराच्या नोटा मिळू लागतील, पाचशेच्या नोटाही मिळू लागल्या की परिस्थिती निवळेल मात्र 8 नोव्हेंबरच्या मध्यरात्री चलनबंदीनंतर बाद झालेले साडे 14 लाख कोटी रुपये पुन्हा चलनात येण्यासाठी किमान फेब्रुवारी तरी उजाडेल.