यवतमाळ : परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांची किडनी निकामी झाल्याचं वृत्त समजल्यापासून त्यांना किडनी दान करण्यासाठी इच्छुकांची रांग लागलीय. यवतमाळच्या गोविंदनगरमध्ये राहणाऱ्या 64 वर्षीय वसंतराव वाऱ्हेकरांनी सुषमा स्वराज यांना किडनी देण्याचा निर्णय घेतला आहे.


जिल्हाधिकारी आणि यवतमाळ भाजपाध्यक्षांना तसं पत्र वसंतरावांनी लिहलं आहे. त्यांच्या या निर्णयात कुटुंबाचीही साथ असल्याचं ते सांगतात. बाभुळगावच्या भूमिअभिलेख विभागातून वरिष्ठ लिपिक पदावरुन ते निवृत्त झाले. मरणोत्तर देहदान करण्याचा संकल्पही त्यांनी केला आहे.

त्यांचा निर्णय कुटुंबीयांनाही मान्य असून वडिलांचे कार्य सर्वात महत्त्वाचं असल्याचं त्यांचे चिरंजीव सांगतात. कुणाच्या अडचणीत मदतीला आलो तर धन्य झालो असे वसंतराव वाऱ्हेकर म्हणतात.

सुषमा स्वराज यांची किडनी निकामी, दिल्लीत उपचार सुरु


परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांची किडनी निकामी झाली आहे. त्यामुळे त्यांच्यावर दिल्लीतील एम्स रुग्णालयात उपचार सुरु आहेत. स्वत: स्वराज यांनीच ट्विटरद्वारे ही माहिती दिली.

“किडनी निकामी झाल्याने मी एम्स रुग्णालयात आहे. सध्या मी डायलिसिसवर आहे. किडनी प्रत्यारोपणसंदर्भातील चाचण्या माझ्यावर उपचार सुरु आहेत. भगवान कृष्णाची कृपा राहू दे” असं ट्विट सुषमा स्वराज यांनी 16 नोव्हेंबरला केलं होतं.

काही दिवसांपूर्वीच सुषमा स्वराज यांनी संयुक्त राष्ट्रात खणखणीत भाषण दिलं होतं. प्रकृती ठीक नसतानाही त्या संयुक्त राष्ट्राच्या महासभेला उपस्थित होत्या. त्यावेळी त्यांनी पाकिस्तानच्या दहशतवादाचा बुरखा फाडला होता. मात्र महासभेहून परतल्यानंतरही मूत्रपिंडाचा त्रास जाणवत होता. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.