औरंगाबाद (बिहार) : पावसामुळे शेतीची नुकसान झालं तर बाजारपेठांमध्ये आपोआपच भाज्यांचे दर वाढतात. अशावेळी भाजी खायची की नाही असा प्रश्न सर्वसामान्यांना कायमच पडतो. पण जर जगातील सर्वात महाग भाजी कोणती आणि तिचा दर काय याची तुम्हाला कल्पना आहे का? अशी एक भाजी आहे जी तब्बल 82 हजार प्रति किलो दराने विकली जाते. किंमत वाचून सुरुवातीला तुम्हाला तुमच्या डोळ्यांवर विश्वास बसला नसेल. शिवाय या भाजीचे दर ऐकून एवढी महागडी भाजी कोण विकत घेत असेल का असा प्रश्न जर तुम्हाला प्रश्न पडला असेल तर उत्तर आहे होय.


विशेष म्हणजे बिहारमधल्या औरंगाबादमधील शेतकरी अमरेश कुमार सिंह या भाजीची शेती करत आहेत. खरंतर जेव्हा त्यांनी भाजीची शेती करण्यास सुरुवात केली तेव्हा आजूबाजूच्या लोकांना ही नेमकी कोणती भाजी याची कल्पना नव्हती. अमरेश कुमार यांनी पिकवलेल्या भाजीचं पीक चांगलं आलं तर ते ही भाजी कुठे विकणार? ही भाजी कोण विकत घेणार? अखेर एवढी महाग भाजी कोण खाणार असे अनेक प्रश्न उपस्थित झाले. परंतु या भाजीच्या पिकाबाबत अमरेश अतिशय आशादायी आहेत. तर जाणून घेऊया जगातील महाग भाजीबद्दल...


हॉप शूट्स (Hop Shoots) जगातील सर्वात महाग भाजी
हॉप शूट्स (Hop Shoots) असं जगातील सर्वात महागड्या भाजीचं नाव आहे. एक किलो हॉप शूट्सची आंतरराष्ट्रीय बाजारातील किंमत 1 हजार युरो म्हणजेच सुमारे 82 हजार रुपये. ही अशी भाजी आहे जी तुम्हाला क्वचितच बाजारात पाहायला मिळेल.


बिहारच्या औरंगाबादमधील अमरेश कुमार सिंह नावाचा शेतकरी जगातील सर्वात महागड्या भाजीचं पीक घेत आहे. करमडीह गावात त्यांची शेती आहे. अमरेश यांच्या मते, वाराणसीतील भारतीय भाजीपाला संशोधन संस्थेमधील कृषी वैज्ञानिक डॉक्टर लाल यांच्या देखरेखीत 5 गुंठे जमिनीवर प्रायोगिक तत्त्वावर याची शेती केली आहे. दोन महिन्यांपूर्वी या भाजीचं रोप लावलं होतं आणि हळूहळू ते मोठं होत आहे. जसजसं रोपटं वाढतंय तसं अमरेश यांच्या अपेक्षाही वाढत आहेत.


औषध आणि बियर बनवण्यासाठी हॉप शूट्सचा वापर
हॉप शूट्स ही भाजी बाजारात उपलब्ध नसते. त्याचा वापर अँटीबॉयोटिक औषधं बनवण्यासाठी केला जातो. टीबीच्या उपचारांमध्ये हॉप शूट्सद्वारे बनवलेलं औषध फायदेशीर ठरतं. या भाजीच्या फुलांचा वापर बियर बनवण्यासाठी केला जातो. या भाजीच्या फुलांना हॉप कोन्स म्हणतात. तर भाजीचे देठ खाल्ल्या जातात. या भाजीचं लोणचंही बनतं, जे फारच महाग असतं.


युरोपियन देशांमध्ये हॉप शूट्सची तुफान मागणी
युरोपातील अनेक देशांमध्येमध्ये या भाजीचं पीक घेतलं जातं. ब्रिटन आणि जर्मनीमधील लोकांना ही भाजी फार आवडते. वसंत ऋतु हा हॉप शूट्सच्या शेतीसाठी योग्य समजला जातो. ही भाजी अँटीऑक्सिडेंटचा समृद्ध स्रोत असल्याने त्वचेला चमकदार आणि चिरतरुण ठेवण्यासाठी याचा वापर केला जातो.


भारतात संशोधन सुरु
भारत सरकार सध्या या भाजीच्या शेतीवर संशोधन करण्यास भर देत आहे. वाराणसीमधील भाजीपाला संशोधन संस्थेत या भाजीच्या शेतीवर फार मोठं काम सुरु आहे. अमरेश कुमार यांनी या भाजीची शेती करण्याच इच्छा व्यक्त केली होती, ती मान्य करण्यात आली. जर त्यांचे प्रयत्न यशस्वी ठरले तर त्यांच्यासह इतर शेतकऱ्यांचंही नशीब फळफळेल.