नवी दिल्ली : लॉकडाऊनमुळे देशातील विविध भागांमध्ये अडकलेल्या परप्रांतिय मजुरांसाठी केंद्र सरकारने श्रमिक स्पेशल ट्रेन सुरु केल्या. या ट्रेनमधून मुंबईसह राज्यभरातून हजारो मजूर आपापल्या गावी परतले. केंद्रीय गृह मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार आतापर्यंत 75 लाखाहून अधिक मजुर आपल्या घरी पोहचले आहे. गृह मंत्रालयाच्या सहसचिव पुण्य सलीला श्रीवास्तव यांनी आज पत्रकार परिषदेत सांगितले की, 35 लाख लोक  विशेष गाड्यांद्वारे त्यांच्या घरी पोहचले आहेत तर 40 लाखाहून अधिक मजूर त्यांच्या राज्यात बसने पोहोचले आहेत. 1 मे पासून आतापर्यंत कामगारांसाठी 2600 विशेष गाड्या चालविण्यात आल्या असून सुमारे 35 लाख मजूर प्रवासानंतर त्यांच्या गावी पोहोचले आहेत.


गृह मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, 2011 च्या जनगणनेनुसार देशातील 4 कोटी लोक असे आहेत की, ज्यांनी रोजगारासाठी आपले मूळ गाव सोडले आहे. पुण्य सलीला श्रीवास्तव म्हणाले की, प्रवासी कामगारांच्या सुरक्षित परतीसाठी गृह मंत्रालयाने सतत राज्यांकडे संपर्क साधून योग्य ती पावले उचलली आहेत. 25 मार्च रोजी लॉकडाऊन सुरू होताच कामगारांना अडचणी येऊ लागल्या, त्या दृष्टीने 27 मार्च रोजी मंत्रालयाने एक अॅडवायजरी जारी केली. त्यामध्ये प्रवासी कामगारांची काळजी व सुरक्षितता सुनिश्चित करण्याच्या सूचना दिल्या. तेव्हापासून गृहमंत्रालयाने स्थलांतरित कामगारांच्या स्थलांतरणाशी संबंधित अडचणींवर मात करण्याचा सतत प्रयत्न केला आहे. घरी परतणाऱ्या परप्रांतीय मजुरांची काळजी व संरक्षण मिळावे यासाठी सूचना देण्यात आल्या. तेव्हापासून गृहमंत्रालयाने स्थलांतरित कामगारांच्या अडचणींवर मात करण्याचा सतत प्रयत्न केला आहे.


देशात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या सातत्याने वाढत आहे. मागील 24 तासात 6 हजार 654 जणांना कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं आहे. तर 137 जणांचा मृत्यू झाला आहे. आरोग्य मंत्रालयाच्या ताज्या आकडेवारीनुसार देशात आता कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 1 लाख 25 हजार 101 झाली आहे. त्यापैकी 3 हजार 720 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 51 हजार 784 जण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत.


संबंधित बातम्या :




Hydroxicloroquin | हायड्रॉक्सिक्लोरोक्विनमुळे मृत्यूचा धोका वाढतो, जगप्रसिद्ध मेडिकल जर्नल लॅन्सेटचा दावा