मुंबई : सीमेपलीकडून दहशतवाद्यांच्या घुसखोरीच्या प्रमाणात मोठ्या संख्येने घट झाली असल्याचा दावा गृहमंत्रालयाकडून करण्यात आला आहे. यावर्षी पहिल्या सहा महिन्यात तब्बल 43 टक्क्यांनी घुसखोरीच्या घटना कमी झाल्या असल्याची माहिती मिळाली आहे.


दहशतवादाविरोधात सरकारने उचललेली कडक पावलं आणि झिरो टॉलरन्स धोरणामुळं दहशतवादी हल्ले आणि स्थानीय लोकांचं दहशतवादाकडं झुकण्याचं प्रमाण कमी झालं आहे. तसेच आतापर्यंत 22 टक्के जास्त दहशतवाद्यांना कंठस्नान घातले आहे.

भारताकडून पाकिस्तान प्रायोजित दहशतवाद आणि घुसखोरीविरोधात कडक पावलं उचलल्यानंतर पाकिस्तानातील दहशतवादी मुखिया आणि आयएसआयचे धाबे दणाणले आहेत. पाकिस्तानी दहशतवादी भारतात पकडला गेला किंवा मारला गेला तर आंतरराष्ट्रीय स्तरावर बदनामी तर होते. सोबतच पाकला आर्थिक फटका देखील बसत आहे. तसेच घुसखोरी वाढल्यावर भारताकडून पुन्हा एकदा त्यांच्या भागात घुसून सर्जिकल अथवा एअर स्ट्राईक केला जाऊ शकतो, ही भीती देखील त्यांच्या मनात आहे.

पाकिस्तानला स्पष्टपणे असा संदेश गेला आहे की, दहशतवादी घटना घडल्या तर भारत काहीही करू शकतो. दहशतवादी पकडले गेले किंवा मारले गेले तर त्याची चर्चा आंतरराष्ट्रीय स्तरावर होते, याचा फटका पाकिस्तानला बसतो. यामुळे सीमेपलीकडून होणारी घुसखोरी आणि दहशतवादी घटनांच्या संख्येत यावर्षी मोठी घट झाली आहे, असे एका अधिकाऱ्याने सांगितले.

पाकिस्तानातून येणाऱ्या एकाही दहशतवाद्याला सोडू नका. पाकिस्तानला त्यांच्याच भाषेत उत्तर दिले जावे. काश्मीरच्या मुद्दयावर भारत कुठल्याही परिस्थितीत मागे हटणार नाही, असे निर्देश गृहमंत्र्यांनी दिल्याचे अधिकाऱ्याने सांगितले.

अशी आहे आकडेवारी

2016 ते  2018 मध्ये  97 दहशतवादी पकडले तर या काळात या दहशतवाद्यांचे 29 तळ शोधून उध्वस्त केले.

2016 मध्ये 150, 2017 मध्ये  213, 2018 मध्ये 257 तर 2019 मध्ये जून महिन्यापर्यंत  113 दहशतवादी मारले गेले आहेत.

दहशतवादी घटनांमध्ये 28 टक्के तर स्थानिक दहशतवाद्यांच्या भरतीमध्ये 40 टक्क्यांनी घट झाली आहे.