नवी दिल्ली : धुमसत्या काश्मीरचा आढावा घेण्यासाठी 4 सप्टेंबरला सर्वपक्षीय शिष्टमंडळ काश्मीरला रवाना होणार आहे. केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह या शिष्टमंडळाचं नेतृत्व करण्याची शक्यता आहे. काश्मीर खोऱ्यात गेल्या 51 दिवसांपासून सुरु असलेला हिंसाचार रोखण्यासाठी केंद्र सरकार कसोशीने प्रयत्न करत आहे. यासाठीच आता केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांच्या नेतृत्त्वात सर्वपक्षीय शिष्टमंडळ काश्मीरमध्ये जाणार असल्याची माहिती मिळते आहे.

 

केंद्र सरकारने सर्वपक्षीय शिष्टमंडळासाठी वेगवेगळ्या पक्षांमधील नेत्यांची एक यादीही तयार केली आहे. रविवारी ‘मन की बात’मध्येही पंतप्रधान मोदींनी काश्मीरचा उल्लेख करुन चिंता व्यक्त केली होती. याआधी जम्मू-काश्मीरच्या मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेऊन काश्मीर खोऱ्यातील हिंसाचाराबद्दल सविस्तर माहिती त्यांना दिली होती.

 

केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी आतापर्यंत दोनवेळा काश्मीरमध्ये जाऊन परिस्थितीचा आढावा घेतला. काश्मीरमधील हिंसाचार रोखण्यासाठी वेगवेगळ्या पक्षांशी राजनाथ सिंह यांनी चर्चाही केली. जे मानवतेवर विश्वास ठेवतात, अशा कुणाशीही चर्चा करण्यास सरकार तयार आहे, असेही यावेळी राजनाथ सिंह यांनी सांगितले.

 

दरम्यान, बुरहान वाणीला भारतीय लष्कारानं कंठस्नान घातलं होतं. त्यानंतर फुटीरतावाद्यांनी काश्मीरमध्ये हिंसाचाराला प्रोत्साहन दिलं होतं. तेव्हापासून काश्मीर धुमसत आहे. दरम्यान, श्रीनगर आणि पुलवामातील दोन भाग वगळता उर्वरित काश्मीर खोऱ्यातून संचारबंदी हटवण्यात आली आहे.