नवी दिल्ली: देशाच्या राजकारणात सध्या बीफ हे एक अस्त्र झालं आहे. याचा वापर अनेक राजकीय व्यक्ती आपल्या फायद्यासाठी करताना दिसत आहेत. या अस्त्राचा वापर करताना भाजप खासदार उदीत राज यांनी त्याची खेळाशी सांगड घालत वादग्रस्त ट्वीट केले.
भाजप खासदार उदीत राज यांनी रिओ ऑलिम्पिकमध्ये दैदिप्यमान कामगिरी करणाऱ्या उसेन बोल्टच्या नावाने एक ट्वीट केले. या ट्वीटमध्ये त्यांनी, ''जमैकाचा धावपटू उसेन बोल्ट गरीब होता. मात्र, त्याच्या ट्रेनरने सकाळ-संध्याकाळ बीफ खाण्याचा सल्ला दिला. यानंतर बोल्टने 9 पदकांची कमाई केली.'' असे ट्वीट केले.
त्यांच्या या ट्वीटवरून मोठे वादळ निर्माण होण्याचा अंदाज आल्यानंतर त्यांनी ते ट्वीट तत्काळ हटवले. मात्र, या वादग्रस्त ट्वीटमुळे त्यांची चांगलीच गोची झाली. सध्या त्यांना यावरून स्पष्टीकरण द्यावे लागत आहे. ''खेळाविषयी समर्पण असेल, तर कोणत्याही परिस्थितीत सुवर्णपदकाची कमाई करता येते. पण जोपर्यंत सरकार सुविधा देत नाही, अशी टीका सुरु राहिल, तोपर्यंत आपण पदकांपासून दूरच राहू,'' असे ते म्हणाले.
आपल्या स्पष्टीकरणाला खिलाडूवृत्ती आणि समर्पणाची जोड देताना ते म्हणाले की, ''खेळाडूंमध्ये खिलाडूवृत्ती तयार करायला हवी. उसेन बोल्ट गरिब होता. शारीरिकदृष्ट्याही कमजोर होता. पण खेळासाठी जिद्दी आणि प्रचंड महत्त्वकांक्षी होता. तसेच तो विजयासाठी सदैव वचनबद्ध होता'' असेही ते म्हणाले.
मात्र, त्यांना बीफसंदर्भातील वादग्रस्त ट्वीटसंदर्भात प्रश्न विचारला असता, यावर त्यांनी सारवासारव करण्याचा प्रयत्न केला. त्यांनी केवळ ट्रेनरच्या वक्तव्याला कॉपी केले असल्याचे स्पष्ट केले.
दरम्यान, उदीत राज यांनी ट्विटरवरून केलेल्या विधानावर भाजपने जरी प्रतिक्रिया दिली नसली, तरी विश्व हिंदू परिषदेने मात्र आक्षेप घेतला आहे. बीफचा आणि ऑलिम्पिक मेडलचा काहाही संबंध नसल्याची प्रतिक्रिया विश्व हिंदू परिषदेच्या प्रवक्त्यांनी दिली आहे.
त्यामुळे गोरक्षणासाठी आग्रही असलेलं भाजप सरकार, आता त्यांच्याच खासदारांच्या विधानावर काय प्रतिक्रिया देते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.