Jammu Kashmir : गेल्या काही दिवसांपासून जम्मू-काश्मीरमध्ये अनेक दहशतवादी संघटना सक्रिय झाल्या असून त्या एकापाठोपाठ एक काश्मिरी पंडितांना (Kashmiri Pandit) तसेच इतर लोकांना लक्ष्य करत आहेत. त्यामुळे सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे. जम्मू-काश्मीर पोलिसांसोबतच सुरक्षा दल अनेक संवेदनशील भागात शोधमोहीम तीव्र करत दहशतवाद्यांचा खात्मा करत आहेत.
जम्मू आणि काश्मीर पोलिसांना मोठे यश
ताज्या बातमीनुसार, जम्मू आणि काश्मीर पोलिसांना शनिवारी मोठे यश मिळाले आहे. अनंतनाग जिल्ह्यात सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीत प्रतिबंधित दहशतवादी संघटना हिजबुल मुजाहिद्दीन (HM) चा कमांडर मारला गेला. चकमकीनंतर माहिती देताना पोलिसांनी सांगितले की, त्यांनी दहशतवाद्यांकडून एके 47 रायफल, इतर अनेक शस्त्रे आणि दारूगोळा जप्त केला आहे.
हिजबुल मुजाहिद्दीनचा कमांडर ठार
माहितीनुसार, जम्मू-काश्मीर पोलिसांचे महानिरीक्षक विजय कुमार म्हणाले की, 'सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीत हिजबुल मुजाहिद्दीनचा दहशतवादी कमांडर निसार खांडे मारला गेला. त्याच्याकडून एके 47 रायफलसह शस्त्रास्त्रे जप्त करण्यात आली आहेत. सध्या, पोलिसांचे सर्च ऑपरेशन चालू आहे.
शोध मोहिमेदरम्यान चकमक
असे सांगितले जात आहे की, शुक्रवारी सुरक्षा यंत्रणांना अनंतनागच्या ऋषीपोरा भागात दहशतवाद्यांच्या उपस्थितीची माहिती मिळाली होती. यानंतर, जम्मू-काश्मीर पोलिसांसह लष्कर आणि सीआरपीएफने परिसराला घेरून शोध मोहीम सुरू केली. यादरम्यान सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीत हिजबुल मुजाहिद्दीनचा एक कमांडर मारला गेला.
तीन जवानांसह एक नागरिक जखमी
जम्मू-काश्मीर पोलिसांनी अशी माहिती दिली आहे की, घेराबंदी दरम्यान लपलेल्या दहशतवाद्यांनी सुरक्षा दलांवर गोळीबार केला होता. या गोळीबारात लष्कराचे तीन जवान आणि एक नागरिक जखमी झाले. यानंतर गोळीबारात जखमी झालेल्या सर्वांना तातडीने श्रीनगरच्या 92 बेस हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले.