History Of Hyderabad Mukti Sangram : एकीकडे देशाला स्वातंत्र्य मिळालं असताना दुसरीकडे जुनागड, भोपाळ आणि हैदराबाद (Hyderabad Mukti Din) या तीन संस्थानांनी वेगळी भूमिका घेतली आणि भारतात सामील होण्यास नकार दिला. हैदराबाद संस्थान (Hyderabad State) म्हणजे त्याकाळचे भारतातील सर्वात मोठे संस्थान. पाकिस्तानशी संधान साधून असलेले निजामाचे (Nizam of Hyderabad) हे संस्थान म्हणजे भारताच्या पोटातील कॅन्सर असल्याचे सरदार पटेल (Sardar Patel) यांचे मत. त्यामुळे चर्चेची दारं बंद झाल्यानंतर शेवटी सरदार पटेलांनी पोलीस कारवाई (Police Action Against Hyderabad) केली आणि 17 सप्टेंबर 1948 रोजी हैदराबाद भारतात विलीन झाले.


History Of Hyderabad Nizam : हैदराबाद संस्थानाची स्थापना आणि निजामाचं राज्य


औरंगजेबाच्या मृत्यूनंतर (Aurangzeb Death) दिल्लीमध्ये पुरता गोंधळ माजला होता. दिल्लीचा बादशहा हा सय्यद बंधूच्या हातचा बाहुला बनला होता. पण त्यांच्या तोडीचा आणखी एक सरदार त्या ठिकाणी होता, तो म्हणजे असफ जहाँ (Asaf Jaha Nizam Of Hyderabad). पण त्याने शाहाणपणा केला आणि दक्षिणेच्या मुलुखाची सुभेदारी स्वीकारली. त्यामुळे बादशाह आणि सय्यद बंधूनी सुटकेचा निश्वास टाकला.


दक्षिणेत आल्यानंतर असफ जहाँने हैदराबाद हे संस्थान स्वतंत्र असल्याचं जाहीर केलं. दिल्लीच्या बादशहाने नाईलाजाने का असेना त्याला मान्यता दिली आणि असफ जहाँला 'निजाम उल मुल्क' ही पदवी बहाल केली. देशात ब्रिटिशांची सत्ता आल्यानंतर हैदराबादने ब्रिटिशांची बाजू घेतली आणि त्यांची मर्जी कायम सांभाळली.


History Of Hyderabad State : हैदराबाद सर्वात मोठं संस्थान


त्याकाळचे हैदराबाद संस्थान म्हणजे आताचे तेलंगाना, आंध्र प्रदेश, संपूर्ण मराठवाडा आणि कर्नाटकचे दोन जिल्हे असा 82,000 स्क्वेअर किलोमीटर पेक्षा मोठा पसारा. हैदराबादचा वार्षिक महसूल हा नऊ कोटी असल्याचं सांगितलं जाते. त्यामुळे निजामाची गणना त्याकाळच्या जगातील सर्वाधिक श्रीमंतांच्या यादीत केली जायची.


हैदराबादची त्यावेळची लोकसंख्या (Hyderabad Population) एक कोटी साठ लाख इतकी होती. त्यामध्ये 80 टक्के हिंदू आणि 20 टक्के मुस्लिमांचा समावेश होता. बहुसंख्य लोक हिंदू आणि शासक मुस्लिम, त्यामुळे अल्पसंख्यांक असलेल्या मुस्लिम समाजाची 90 टक्क्याहून अधिक पदांवर वर्णी लागलेली होती. निजामावर ब्रिटिशांची मर्जी असल्यामुळे त्या काळात हैदराबादची स्वतंत्र रेल्वे सेवा होती.


स्वातंत्र्यपूर्व भारतात 565 संस्थानं (India Princely States) होती. स्वातंत्र्यानंतर बहुतांश संस्थानांनी भारतात सामील व्हायचं ठरवलं. फक्त जुनागड, भोपाळ आणि हैदराबाद त्याला अपवाद होता. नंतर जुनागडवर कारवाई करण्यात आली तर भोपाळ भारतात सामील झालं. आता फक्त हैदराबाद बाकी उरलं होतं.


Hyderabad Nizam Connection With Pakistan : निजामाचे पाकिस्तानसोबत संधान


हैदराबाद संस्थान बरोबर भारताच्या मध्यवर्ती ठिकाणी होतं आणि त्याच्या निजामाने पाकिस्तान सोबत संधान साधलेलं होतं. हैदराबाद स्वतंत्र राहावे यासाठी पाकिस्तान आणि माउंटबॅटन यांचे प्रयत्न सुरू होते. हैदराबादने राष्ट्रकुल देशांचे सदस्यत्व (Commonwealth Nations History) मिळावं यासाठी अर्ज केला होता. पोर्तुगीज आणि अमेरिकेचा निजामाला छुपा पाठिंबा होता. त्यामुळेच युरोपियन देशांकडून हैदराबादला गुप्त पद्धतीने हत्यार पुरवण्याचे प्रयत्न सुरू होते.


या सगळ्या गोष्टी पाहता हैदराबादला स्वतंत्र्य ठेवणे म्हणजे भारतासाठी धोकादायक होतं. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत हैदराबाद भारतात सामील झालंच पाहिजे यासाठी सरदार वल्लभभाई पटेल यांचे प्रयत्न सुरू होते.


History Of Hyderabad Razakar : रझाकारांचा अत्याचार 


दुसरीकडे निजामाने हैदराबादच्या सुरक्षेसाठी रझाकारांचे सैन्य (Hyderabad Razakar) उभे केले होते. त्याचा मोरक्या होता तो कासिम रिझवी (Kasim Rizavi). रझाकारांनी हैदराबादमध्ये हिंदूंवर अन्वयित अत्याचार सुरू केले. महिलांवर अत्याचार, लूटमार, दंगल, हत्या असा सर्रास कार्यक्रम त्याने राबवला. हैदराबाद संस्थानला खेटून असलेल्या प्रदेशातही त्याने अत्याचार सुरू केला. इतकंच काय तर चर्चेसाठी दिल्लीला जाऊन त्याने थेट सरदार पटेल यांनाच धमकी दिली होती.


रझाकारांच्या सैन्याने 22 मे 1948 रोजी गंगापूर रेल्वे स्टेशनवर (Gangapur Railway Station Incident) प्रवासांवर हल्ला केला. त्यामध्ये अनेक जण मृत्युमुखी पडले. त्यामुळे निजामावर कारवाई करण्यासाठी आता भारत सरकारवर दबाव वाढू लागला होता.


Hyderabad Police Action : हैदराबादमध्ये पोलीस कारवाई सुरू


हैदराबादमध्ये लष्करी कारवाई करण्यासाठी सरदार पटेल यांनी हालचाली सुरू केल्या. पण या कारवाईला लष्करी कारवाई असे न म्हणता पोलीस कारवाई असं नाव देण्यात आलं. कारण लष्करी कारवाई परकीय राष्ट्राच्या विरोधात केली जाते. हैदराबाद तर भारताचाच भाग आहे, त्यामुळे पोलीस कारवाई करण्याचं ठरलं. यामुळे पाकिस्तानसह इतर देशांची तोंडंही बंद होणार होती.


What is Operation Polo : ऑपरेशन पोलो हे नाव का देण्यात आलं?


हैदराबादमध्ये त्यावेळी जगातील सर्वाधिक म्हणजे 17 पोलो ग्राउंड होते. त्यामुळे या कारवाईला 'ऑपरेशन पोलो' असं नाव देण्यात आलं. 13 सप्टेंबर 1948 रोजी भारतीय लष्कर हैदराबादमध्ये घुसलं. त्यावेळी गोरखा बटालियनने जबरदस्त आक्रमण केलं. रझाकारांचे सैन्य जेमतेम 24 हजारांच्या आसपास होतं. अवघ्या तीनच दिवसात हैदराबादमधील सर्व प्रमुख ठिकाणं भारताच्या ताब्यात आली. भारतीय सैन्याच्या आक्रमणापुढे रझाकार तग धरू शकले नाहीत. 17 सप्टेंबर रोजी म्हणजे पाच दिवसांनी निजामाने शरणागती पत्करली.


भारतीय लष्कराने 108 तासांमध्ये निजामाला गुडघ्यावर आणलं. या कारवाईत भारताचे 66 जवान शहीद झाले तर 1373 रझाकार मारले गेले अशी आकडेवारी बीबीसीच्या एका वृत्तात दिली आहे. निजाम शरण आला, तर कासिम रिझवीला अटक करण्यात आली आणि नंतर त्याला पाकिस्तानमध्ये सोडण्यात आलं.


हैदराबादच्या विलिनीकरणानंतर खऱ्या अर्थाने भारतीय स्वातंत्र्याला अर्थ प्राप्त झाला. या घटनेच्या स्मरणार्थ दरवर्षी 17 सप्टेंबर रोजी हैदराबाद मुक्ती दिन पाळला जातो. मराठवाड्यात हा दिवस मराठवाडा मुक्ती दिन म्हणून पाळला जाऊ लागला.