नवी दिल्ली: सेंटर फॉर सायंटिफिक अँड इंडस्ट्रिअल रिसर्च CSIR या संस्थेतील शास्त्रज्ञांनी आता पायलट बेसिसवर हिमाचल प्रदेशात हिंगाची लागवड करायला सुरवात केली आहे. यामुळे येत्या काही वर्षात हिंगाची लागवड भारतात एक सर्वसामान्य पद्धत होईल, असा त्यांचा अंदाज आहे.
हिंग हा मसाल्याचा पदार्थ भारतातील खाद्यप्रकारातील एक अत्यंत महत्वाचा घटक समजला जातो. परंतु त्याचे उत्पादन भारतात केले जात नाही. सध्या आपल्या देशाला हिंग देखील अफगाणिस्तान, इराण आणि उझबेकिस्तान या देशांतून आयात करावी लागते.
CSIR च्या मते हिंग हा प्रकार अफगाणिस्तान आणि इराणच्या थंड वाळवंटी प्रदेशात पिकवला जातो. हिंगाच्या एकूण जागतिक वापरापैकी भारतात 40 टक्के हिंगाचा वापर केला जातो. परंतु असे असले तरी स्थानिक स्तरावर त्याच्या उत्पादनाचा कधीही प्रयत्न केलेला नाही. CSIR च्या हिमालयीन बायोरिसोर्सेस टेक्नॉलॉजी, पालमपूर या संस्थेचे संचालक संजय कुमार यांनी 2016 सालापासून स्थानिक पातळीवर हिंग उत्पादनाचा प्रयत्न सुरु केला आहे.
हिंग हा खाद्यपदार्थातील एक महत्वाचा घटक आहे ज्यामुळे खाद्यप्रकारात आलं आणि कांद्याचा वापर कमी केला जाऊ शकतो. याचा सुवास हा अत्यंत उग्र असला तरी त्याच्या चिमूटभर वापराने अन्नपदार्थाला विशेषत: शाकाहारी पदार्थाला विशेष चव येते. हिंगाचा वापर हा भारतात आणि भारताबाहेरही वेगवेगळ्या कारणांनी केला जातो. भारतात त्याचा वापर हा किडनी स्टोन आणि फुप्फुसांच्या नळ्यांना आलेली सूज यांच्या उपचारासाठीही केला जातो. अफगाणिस्तानमध्ये याचा वापर हा सर्दी, खोकला आणि अल्सरच्या निदानासाठी केला जातो तर इजिप्तमध्ये लघवीचे प्रमाण वाढवण्यासाठी याचा वापर केला जातो.
हिमाचल प्रदेशच्या लाहौल आणि स्पिती हा भाग अफगाणिस्तानसारखा शीत वाळवंट प्रकारातील आहे जो हिंगाच्या उत्पादनासाठी आदर्श समजला जातो. सध्या जवळपास 500 हेक्टरच्या भागावर हिंगाचे उत्पन्न घेण्यात येत आहे. परंतु तज्ञांच्या मते अफगाणिस्तान आणि इराणच्या हिंगाप्रमाणे त्याची गुणवत्ता प्राप्त होण्यासाठी त्याला आणखी चार ते पाच वर्षाचा कालावधी लागण्याची शक्यता आहे. CSIR चे वैज्ञानिक या प्रयोगासाठी हिमाचल प्रदेश शासनासोबत समन्वय ठेवून स्थानिक शेतकऱ्यांना हिंगाच्या लागवडीचे शास्त्रीय प्रशिक्षण देत आहेत. ही वनस्पती केवळ एक किंवा दोन महिन्यांसाठी जमिनीच्या पृष्ठभागावर असते. बर्फवृष्टी सुरु झाल्यानंतर ती बर्फाच्या खाली दबली जाते आणि हायबरनेशनच्या स्थितीत जाते.
हिमाचल प्रदेश सरकारकडून या प्रयोगासाठी चार कोटी रुपयांची मदत केली गेली आहे. त्यातून एक टिशू कल्चर प्रयोगशाळा उभारण्यात येणार आहे आणि लाखो रोपट्यांचे उत्पादन करण्यात येणार आहे.
हा पायलट बेसिसवरचा प्रयोग जर यशस्वी झाला तर वैज्ञानिक लडाख, अरुणाचल प्रदेश आणि उत्तराखंडच्या काही भागात हिंगाची लागवड करतील. असे झाले तर येत्या काही वर्षात भारताला हिंगाची आयात करण्याची गरज भासणार नाही आणि त्यावर खर्च होणाऱ्या अब्जावधी रुपयांची बचत होईल.