HAL Prachand Helicopter: हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड (HAL) ने अलीकडेच लढाऊ हेलिकॉप्टर ‘प्रचंड’साठी कराराची घोषणा केली होती. या करारामुळे भारताच्या संरक्षण क्षेत्राला आणखी बळकटी मिळणार आहे. 156 हलक्या लढाऊ हेलिकॉप्टर्सच्या खरेदीसाठी 62 हजार कोटी रुपयांहून अधिक किमतीच्या कराराला मंजुरी देण्यात आली आहे. या हेलिकॉप्टर्सचं उत्पादन कर्नाटकमधील बेंगळुरू आणि तुमकुर येथे केलं जाणार आहे. हा करार चीन आणि पाकिस्तानच्या सीमांवर लष्करी कारवायांची क्षमता मजबूत करण्यास मदत करणार आहे.
सरकारने आत्मनिर्भर भारत उपक्रमांतर्गत ‘मेक इन इंडिया’ च्या माध्यमातून संरक्षण क्षेत्रातही स्वयंपूर्णतेकडे वाटचाल करण्यावर भर दिली आहे. याच दिशेने ‘प्रचंड’ हेलिकॉप्टर्स तयार केली जाणार आहेत. एचएएल (हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड) कडून भारतात डिझाइन आणि निर्मिती करण्यात आलेलं हे एक मल्टी-रोल लढाऊ हेलिकॉप्टर आहे.
जाणून घ्या ‘प्रचंड’ हेलिकॉप्टरची खास वैशिष्ट्यं
- 1999 मध्ये कारगिल युद्धाच्या काळात, संरक्षण मंत्रालयाला प्रथमच लक्षात आलं की उंच पर्वतीय भागात ऑपरेशनसाठी स्टेल्थ हेलिकॉप्टर्सची गरज आहे. त्यानंतर अशा प्रकारच्या हेलिकॉप्टर्सवर काम सुरू करण्यात आलं.
- हे हेलिकॉप्टर 15 हजार फूटांहून अधिक उंचीवर सहजतेने कार्य करू शकतं. ही क्षमता त्याला हिमालयातील सीमांवर आणि दुर्गम भागांमध्ये अत्यंत उपयुक्त बनवते. यामध्ये एअर-टू-एअर मिसाईल्स, अँटी-टँक गाइडेड मिसाईल्स आणि रॉकेट्स लावता येतात.
- हे हेलिकॉप्टर शत्रूच्या एअर डिफेन्स सिस्टीमला नष्ट करण्याची क्षमता ठेवतं. हे जगातील एकमेव स्टेल्थ हेलिकॉप्टर आहे जे 16,400 फूट उंचीवर उतरू शकतं आणि तिथून उड्डाणही करू शकतं.
- यामध्ये नाईट व्हिजन आणि इन्फ्रारेड सिस्टम बसवण्यात आले आहेत, त्यामुळे हे अंधारातही अचूकपणे लक्ष्यभेद करू शकतं. बदलत्या तंत्रज्ञानानुसार यामध्ये रडार वॉर्निंग रिसीव्हर, मिसाईल अप्रोच वॉर्निंग सिस्टीम आणि लेझर वॉर्निंग सिस्टीमसारखे अत्याधुनिक सुरक्षा तंत्रज्ञान बसवलेले आहे.
- या हेलिकॉप्टरची कमाल गती 288 मैल प्रति तास (सुमारे 463 किमी/तास) इतकी असणार आहे. ‘प्रचंड’चा पहिला प्रोटोटाइप मार्च 2010 मध्ये पहिल्यांदा उडवण्यात आला आणि याने सियाचिन ग्लेशियरसह उंच भागात यशस्वी लँडिंग व उड्डाण करत आपली क्षमता सिद्ध केली.
- हे हेलिकॉप्टर मिळाल्यानंतर भारताला चीन आणि पाकिस्तानविरुद्ध मोठा फायदा होणार आहे. भारतात उत्पादित होणारे 'प्रचंड' हेलिकॉप्टर परदेशी हेलिकॉप्टरपेक्षा खूपच स्वस्त आहे.
- HAL ने पुष्टी केली आहे की, मार्च 2028 पासून ‘प्रचंड’ची पहिली बॅच डिलिव्हर होण्यास सुरुवात होईल. एकूण 156 हेलिकॉप्टर्स तयार केली जाणार आहेत. यामधून 66 भारतीय वायुसेनेला आणि 90 भूसेनेला दिली जातील. HAL चं उद्दिष्ट आहे की, पाच-साडेपाच वर्षात सर्व हेलिकॉप्टर्स वितरित केले जातील.