Indus Water Treaty : जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे 22 एप्रिल रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानसोबतचा सिंधू पाणी करार (Indus Water Treaty) थांबवला होता. तेव्हापासून, पाकिस्तान आंतरराष्ट्रीय व्यासपीठांवर याबद्दल सतत ओरड करत आहे. आता पाकिस्तानने संयुक्त राष्ट्रांमध्ये म्हटले आहे की भारताचा हा निर्णय खूप धोकादायक आहे. हे आंतरराष्ट्रीय नियमांच्या विरुद्ध आहे. या निर्णयामुळं पाकिस्तानच्या 24 कोटी लोकांचे जीवन धोक्यात आल्याचे पाकिस्तानने म्हटलं आहे. 

संयुक्त राष्ट्रांच्या बैठकीत पाकिस्तानचे प्रतिनिधी उस्मान जादून म्हणाले की, भारताचा हा निर्णय आंतरराष्ट्रीय नियमांचे आणि मानवी हक्कांचे उल्लंघन आहे. आम्ही याचा तीव्र निषेध करतो. पाकिस्तानी राजदूताने भारताला नदीचे पाणी थांबवणे किंवा वळवणे यासारख्या गोष्टी करू नयेत असे आवाहन केले. या नद्या लाखो पाकिस्तानी लोकांसाठी जीवनरेखा आहेत. पाकिस्तानने जगाला पाण्याचा शस्त्र म्हणून वापर करण्याचे प्रयत्न थांबवण्याचे आवाहन केले. पाकिस्तानी प्रतिनिधीने संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेला या प्रकरणावर लक्ष ठेवण्याचे आणि वेळेवर कारवाई करण्याचे आवाहन केले जेणेकरून कोणतेही मोठे संकट उद्भवू नये.

सिंधू जल करारावरुन पाकिस्तानच्या धमक्या 

सिंधू नदीचे पाणी थांबवल्यानंतर पाकिस्तान सतत धमक्या देत आहे. पाकिस्तानचे माजी परराष्ट्र मंत्री बिलावल भुट्टो यांनी त्यांच्या एका विधानात म्हटले होते की, सिंधू आमची आहे. त्यामुळं या नदीतून एकतर आमचे पाणी  वाहील किंवा त्यांचे रक्त सिंधूत वाहेल, असे वक्तव्य बिलावल भुट्टो यांनी केल्यामुळं भारतातून या विरोधात संताप व्यक्त केला जात आहे. दरम्यान, पहलगाम हल्ल्यानंतर भारताने सिंधू पाणी करार रद्द केला होता.

भारताचे पाणी फक्त भारतातच वाहणार : पंतप्रधान नरेंद्र मोदी

भारताचे पाणी फक्त भारतातील लोकांसाठी आहे. ते फक्त भारतातच वाहेल असे मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केले आहे. दरम्यान, पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने प्रत्युत्तर देत ऑपरेशन सिंदूर राबवले आणि पीओकेमधील 9 दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त केले. 7 ते 10 मे दरम्यान पाकिस्तानने ड्रोन आणि क्षेपणास्त्रांचा वापर करून हल्ला केला होता, परंतु भारताने त्याला योग्य उत्तर दिले.

10 मे रोजी दोन्ही देशांमध्ये युद्धबंदीचा निर्णय

10 मे रोजी दोन्ही देशांनी युद्धबंदी करारावर स्वाक्षरी झाली आहे. दरम्यान, भारताने सिंधू पाणी करार पुन्हा सुरु करण्याचे आवाहन फेटाळून लावले. भारत सरकारने म्हटले आहे की जोपर्यंत पाकिस्तान दहशतवादाला प्रोत्साहन देणे थांबवत नाही तोपर्यंत इतर कोणत्याही मुद्द्यावर चर्चा होणार नाही.

महत्वाच्या बातम्या:

पाकिस्तान नरमलं! सिंधू पाणी प्रश्न सोडवा नाहीतर आपण उपासमारीने मरु, खसादार सय्यद अली जफरचं वक्तव्य