बंगळुरु : हिंदू धर्मीयांनी मुस्लिमांशी लग्न करु नये, असं कारण पुढे करत बंगळुरुतील हॉटेलमध्ये एका दाम्पत्याला रुम नाकारल्याची आश्चर्यकारक घटना समोर आली आहे. हा धक्कादायक प्रकार उघड होताच सर्व स्तरातून टीकेचे सूर उमटत आहेत.
शफिक सुबैदा हक्कीम या मुस्लिम युवकाचा विवाह दिव्या डीव्ही या हिंदू धर्मीय तरुणीशी झाला. केरळात राहणारं हे दाम्पत्य कामानिमित्त बंगळुरुला गेलं. सुदामानगरमधील अन्निपुरम मेन रोडवर असलेल्या ऑलिव्ह रेसिडन्सीमध्ये राहण्यासाठी ते रुम बुक करायला गेले. यावेळी त्यांना अपमानाला सामोरं जावं लागलं.
हिंदू आणि मुस्लिम धर्मीय एकत्र राहू शकत नसल्याचं ऑलिव्ह रेसिडन्सी हॉटेलच्या रिसेप्शनिस्टने त्यांना सांगितलं. विशेष म्हणजे हिंदू-मुस्लिम जोडप्यांना रुम्स देऊ नका, त्यामुळे समस्या उद्भवू शकतात, अशा सूचना आपल्याला हॉटेल प्रशासनाने दिल्याचंही त्याने स्पष्ट केलं.
यापूर्वी कधीच अशाप्रकारची अपमानास्पद वागणूक मिळाली नव्हती, त्यामुळे आपल्याला मोठा धक्का बसल्याची प्रतिक्रिया शफीकने दिली. 'माझी पत्नी दिव्या एका प्रतिष्ठित कायदा महाविद्यालयात मुलाखतीसाठी आली होती. त्यामुळे आम्हाला केवळ दोन तासांसाठी रुम हवी होती.' असं शफीकने सांगितलं. दिव्या एलएलएम ग्रॅज्युएट असून तिला पीएचडी करायची आहे.
आंतरधर्मीय विवाह केलेल्या जोडप्यांना हॉटेलची खोली देऊ नये, अशी हॉटेलची पॉलिसी असल्याचं त्यांनी सांगितलं. दिव्याने या धोरणाची लेखी प्रत देण्याची मागणी केली असता रिसेप्शनिस्टने आम्हाला उडवून लावलं, असंही शफीकने सांगितलं.
अखेर दोघांनी दुसरं हॉटेल शोधलं. बंगळुरुतील दोघांची कामं व्यवस्थित पार पडली. मात्र केरळ मानवी हक्क आयोगाकडे तक्रार नोंदवण्याचा दाम्पत्याचा विचार आहे.