नवी दिल्ली: अवैध बांधकाम पाडण्यासाठी गेलेल्या सहाय्यक महिला नगरविकास अधिकाऱ्याची, गोळी मारुन हत्या केलेल्या हॉटेल मालकाला बेड्या ठोकल्या आहेत.


दिल्ली क्राईम ब्रांचच्या मदतीने हिमाचल पोलिसांनी आरोपी हॉटेल मालक विजय कुमारला अटक केली. आज त्याला कोर्टात हजर करण्यात येणार आहे.

दोन दिवसापूर्वी शैलबाला शर्मा या महिला अधिकारी विजय कुमारच्या अवैध हॉटेलवर कारवाई करण्यासाठी गेल्या होत्या. त्यावेळी विजय कुमारने त्यांच्यावर गोळीबार करुन हत्या केली होती.

हिमाचल पोलिसांनी आरोपीला उत्तर प्रदेशातील मथुरा इथं अटक केली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विजय कुमार एक मे रोजी हत्या करुन, हिमाचलमधील कसौलीतून पळाला होता. तो दिल्लीत आल्याची कुणकुण पोलिसांना होती. तो दिल्लीतूनही मथुरेला रवाना झाला. तिथेच पोलिसांनी त्याला पकडलं.

लोकेशन ट्रेस करुन पकडलं

पोलिसांनी सतत जागा बदलत पळणाऱ्या विजय कुमारला लोकेशन ट्रेस करुन पकडलं. हिमाचल प्रदेश पोलिसांना विजय कुमारचं लोकेशन दिल्लीत दाखवत होतं. त्यामुळे त्यांनी दिल्ली पोलिसांशी संपर्क साधला.

आरोपी सतत फोनवरुन त्याच्या एका नातेवाईकाशी संपर्कात होता. पोलिसांनी तोच फोन ट्रेस करुन, विजय कुमारला बेड्या ठोकल्या.

बुधवारी विजय कुमारचं लोकेशन दिल्लीत दिसत होतं. मग पुन्हा तो मथुरेला गेला. दिल्ली आणि हिमाचल पोलिस सातत्याने त्याचा माग काढत पुढे सरकत होते.

त्याचवेळी विजय कुमारचा मोबाईल बंद झाला. मग गुरुवारी सकाळी पुन्हा त्याने फोन सुरु केला, तेव्हा त्याचं लोकेशन वृंदावर दिसलं.

पोलिसांनी पुन्हा वृंदावनकडे धाव घेतली आणि विजय कुमारला बेड्या ठोकल्या.

काय आहे प्रकरण?

शैलबाला शर्मा यांच्या नेतृत्त्वात प्रशासनाची टीम मंगळवारी सकाळी 11 वाजता कसौलीच्या नारायण गेस्ट हाऊसचं अतिक्रमण हटवण्यासाठी गेल्या होत्या. त्यांनी गेस्ट हाऊसच्या मालकीण नारायण देवी आणि त्यांचा मुलगा विजयला समजावलं. पण काहीही न ऐकता ते कारवाईला विरोध करत होते.

कारवाईत अडथळा निर्माण केल्याप्रकरणी उपविभागीय दंडाधिकाऱ्यांनी विजयला ताब्यात घेण्यास सांगितलं. त्यावेळी विजयने अधिकाऱ्यांकडे काही वेळ मागितला. यानंतर प्रशासनाची टीम दुसऱ्या ठिकाणी कारवाईसाठी गेली.

टीम दुसऱ्यांदा आल्याने गोळीबार
मग दुपारी 2.30 च्या सुमारास शैलबाला पुन्हा गेस्ट हाऊसला पोहोचल्या. टीमचे सदस्य गेस्ट हाऊसच्या आत दाखल होताच रिसेप्शनजवळ उभ्या असलेल्या विजयने पिस्तुलातून दोन गोळ्या झाडल्या. यानंतर तिथे एकच गोंधळ उडाला.

स्वत:चा बचाव करण्यासाठी शैलबाला मागच्या दिशेने धावल्या. पण त्याचवेळी त्यांना एक गोळी लागली. रुग्णालयात पोहोचल्यावर डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं. गोळीबारानंतर अतिक्रमणविरोधी कारवाई रोखण्यात आली.

महत्त्वाचं म्हणजे विजस स्वत: वीज विभागात सरकारी कर्मचारी आहे.

संबंधित बातमी

अवैध बांधकाम पाडणाऱ्या महिला अधिकाऱ्याची हॉटेल मालकाकडून हत्या