आग्रा/जयपूर : राजस्थान आणि उत्तर प्रदेशासह उत्तर भारतातील अनेक भागात धुळीच्या वादळाने कहर केला. या वादळात आतापर्यंत तब्बल 86 लोकांना जीव गमवावा लागला आहे. तर हजारो लोक जखमी झाले आहेत.
या वादळामुळे संध्याकाळी पारा 10 अंश सेल्सिअसपर्यंत घसरलं. या वादळामुळे सामान्यांचं जनजीवन विस्कळीत झालं आहे. याशिवाय पंजाबचा काही भागही वादळामुळे प्रभावित झालं आहे.
राजस्थान आणि उत्तर प्रदेशचा पश्चिम भाग तसंच उत्तर भागाला याचा सर्वात मोठा फटका बसला आहे.
उत्तर प्रदेशात 64 जणांना बळी
आपत्ती व्यवस्थापन विभागाने उत्तर प्रदेशच्या 19 जिल्ह्यात 64 जणांचा मृत्यू झाल्याचं सांगितलं. यामधील 43 मृत नागरिक एकट्या आग्य्रातील आहे. याशिवाय बिजनौरमध्ये 3, सहारनपूरमध्ये 2, चित्रकूट, रायबरेली आणि बरेलीमध्ये प्रत्येकी एक मृत्यूमुखी पडला आहे. तर कानपूरमध्येही तिघांचा मृत्यू झाल्याचं वृत्त आहे. उत्तर प्रदेशच्या महसूल आणि मदत आयुक्त संजय कुमार यांनी मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली आहे. दरम्यान, यूपीच्या 31 जिल्ह्यात 5 मेपर्यंत अलर्ट जारी केला आहे.
संजय कुमार म्हणाले की, प्रभावित जिल्ह्यातील लोकांना 24 तासात मदत आणि बचाव सामग्री पुरवली जाईल.
150 अधिक जनावरांचा वादळात मृत्यू झाला आहे. राज्य सरकाराने मृतांच्या कुटुंबांना चार लाख रुपयांची नुकसान भरपाई देण्याची घोषणा केली आहे. याशिवाय गंभीर जखमींना 50 हजार रुपयांची मदत देण्याचे निर्देश दिले आहेत.
राजस्थानात 22 मृत्यूमुखी
तर दुसरीकडे राजस्थानमध्येही 22 जणांचा मृत्यू झाला असून 100 लोक जखमी झाले आहेत. राजस्थानच्या बीकानेर, भरतपूर, अलवर आणि धौलपूरमध्ये वादळाने सर्वाधिक नुकसान झालं आहे. वादळाचा वेग सुमारे 135 किमी प्रतितास होता. यामुळे जिल्ह्यात शेकडो झाडं आणि विजेचे पोल उन्मळून पडले आहेत. चुरु, पिलानी, दौसा और झुंझनू इथे गारपीट झालं आहे. हवामान विभागाच्या माहितीनुसार, पुढील 48 तासात राजस्थानात हलक्या स्वरुपाचा पाऊस आणि धुळीचं वादळ येऊ शकतं.