नवी दिल्ली :देशातील विविध राज्यातील 13 विधानसभा मतदारसंघामध्ये पोटनिवडणुकीचा निकाल आज जाहीर झाला. पश्चिम बंगालमध्ये चार जागांवर तृणमूल काँग्रेसनं विजय मिळवला.काँग्रेसनं हिमाचल प्रदेशमधील तीन पैकी दोन आणि उत्तराखंडमधील दोन्ही जागांवर विजय मिळवला. बिहारमध्ये जदयू आणि राजदला धक्का बसला असून तिथं अपक्ष उमेदवारानं विजय मिळवला. पंजाबमध्ये आपचा उमेदवार विजयी झाला. मध्य प्रदेशमध्ये कमलनाथ यांच्या बालेकिल्ल्यात भाजपनं विजय मिळवला. तर, तामिळनाडूमध्ये द्रमुकच्या उमेदवारानं विजय मिळवला. 


हिमाचल प्रदेशात काँग्रेसला दोन जागा,भाजपला एक जागा


हिमाचल प्रदेशमध्ये विधानसभेच्या तीन जागांसाठी पोटनिवडणूक पार पडली. काही दिवसांपूर्वी झालेल्या राज्यसभा निवडणुकीत अपक्ष आमदारांनी भाजप उमेदवाराला मतदान करत आमदारकीचा राजीनामा भाजपमध्ये प्रवेश केला होता. या तीन आमदारांच्या मतदारसंघात पोटनिवडणूक लागली होती.हिमाचल प्रदेशच्या हमीरपूर, नालागढ आणि देहरा या तीन मतदारसंघात पोटनिवडणूक लागली होती. यापैकी नालागढ आणि देहरामधून काँग्रेस उमेदवारानं विजय मिळवला.तर हमीरपूरमध्ये  भाजपचे  आशिष शर्मा जिंकले आहेत.  


हिमाचल प्रदेशच्या हमीरपूर, नालागढ आणि देहरा या तीन मतदारसंघामध्ये पोटनिवडणूक लागली होती. आशिष शर्मा, होशियार सिंग, के.एल. ठाकूर यांनी आमदारकीचा राजीनामा देत विधानसभेची पोटनिवडणूक लढवली. नालागढ मतदारसंघातून काँग्रेसच्या हरदीप सिंग बावा यांनी भाजपच्या के.एल. ठाकूर यांना पराभूत केलं. हरदीप सिंग  बावा यांना 34608 मतं मिळाली.  के.एल.ठाकूर यांना 25618 मतं मिळाली. 


हमीरपूरमध्ये भाजपचे आशिष शर्मा 27041 मतं मिळवत विजयी झाले. त्यांनी काँग्रेसच्या पुष्पिंदर वर्मा यांचा 1571 मतांनी पराभव केला. वर्मा यांना 25470 मतं मिळाली. देहरा विधानसभा मतदारसंघाची निवडणूक काँग्रेससाठी महत्त्वाची होती. कारण इथं काँग्रेस नेते मुख्यमंत्री सुखविंदरसिंह सुक्खू  यांच्या पत्नी  कमलेश ठाकूर विधानसभेच्या रिंगणात होत्या. कमलेश ठाकूर यांना 32737 मतं मिळाली. तर भाजपच्या होशियार सिंग यांना 23338 मतं मिळाली .  


विधानसभा पोटनिवडणुकीत इंडिया आघाडीला यश


देशात एकूण विधानसभेच्या 13 जागांसाठी पोटनिवडणूक जाहीर झाली होती. त्यासाठी मतदानं पार पडल्यानंतर आज मतमोजणी पार पडली. तृणमूल काँग्रेसनं पश्चिम बंगालमध्ये वर्चस्व कायम ठेवलं. त्यांनी चार जागा जिंकल्या. उत्तराखंडमध्ये काँग्रेसनं बद्रीनाथची जागा कायम ठेवली. तर, तर दुसरी जागा बसपाच्या ताब्यातून काँग्रेसनं मिळवली. हिमाचल प्रदेशात काँग्रेसला दोन तर भाजपला एक जागा मिळाली.पंजाबमध्ये आपनं जागा मिळवली. बिहारमध्ये अपक्ष उमेदवारानं विजय मिळवला. तामिळनाडूत द्रमुकनं 1 जागा मिळवली. मध्य प्रदेशात भाजपनं एक जागा मिळवली. एकूण 13 जागांपैकी चार जागा टीएमसी, चार जागा काँग्रेस, दोन जागा भाजप,एक आप,एक द्रमुक आणि एक जागा अपक्ष उमेदवाराला मिळाली.  


संबंधित बातम्या: 


Uttarakhand By Election Result 2024 : अयोध्येपाठोपाठ आता बद्रीनाथमध्येही भाजपचा पराभव; काँग्रेसचा दमदार विजय


Assembly By-Elections Result : सात राज्यातील 13 विधानसभा पोटनिवडणुकीत इंडिया आघाडीचा डंका, भाजपला तगडा झटका!