Himachal CM : सुखविंदर सिंह सुक्खू (sukhwinder sukhu) यांनी आज हिमाचल प्रदेशचे 15 वे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. त्यांच्यासोबत काँग्रेस नेते मुकेश अग्निहोत्री यांनी हिमाचल प्रदेशच्या उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. या शपथविधी सोहळ्याला काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, राहुल गांधी, प्रियांका गांधी यांच्यासह सर्व ज्येष्ठ नेते उपस्थित होते. 


हिमाचलमध्ये विजय मिळाल्यापासूनच मुख्यमंत्रीपदाच्या दाव्यावरून वाद सुरू होता. सर्व दिग्गज दावेदार मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत होते. प्रतिभा सिंह यांच्याच गळ्यात मुख्यमंत्रिपदाची माळ पडेल असा अंदाज वर्तवला जात होता.  कारण गेल्या 40 वर्षांपासून होली लॉज म्हणजेच वीरभद्र कुटुंबाचा हिमाचल प्रदेशच्या राजकारणात दबदबा आहे. परंतु, या सर्व शक्यतांना शनिवारी संध्याकाळी पूर्णविराम मिळाला. काँग्रेस हायकमांडने शनिवारी सुखविंदर सिंह सुक्खू  यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले. मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत अनेक दिग्ज होते. परंतु, सर्वांना मागे टाकून सुखविंदर सिंह सुक्खू  यांनी बाजी मारली. त्यामागे देखील काही कारणे आहेत. 


Himachal CM : प्रचंड मेहनत
सुखविंदर सिंह सुक्खू ह एका साध्या कुटुंबातून आलेले आहेत. शिवाय राजकारणात त्यांचा कोणताही गॉडफादर नाही. सुखविंदरसिंह सक्खू यांनी प्रचंड मेहनत घेऊन राजकारणात स्वतःची ओळख निर्माण केली आहे. त्यांचे वडील बस चालक होते. शिवाय सक्खू त्यांच्या सुरुवातीच्या काळात शिमल्यात एक लहान दूध डेअर चालवत होते. 


Himachal CM : राजकीय कारकीर्द


सुखविंदर सिंह सुक्खू यांनी आपली राजकीय कारकीर्द काँग्रेसची विद्यार्थी संघटना एनएसयूआयमधून सुरू केली. विद्यार्थी राजकारणात त्यांनी विद्यार्थ्यांमध्ये जबरदस्त पकड निर्माण केली. त्यातूनच त्यांना फायरब्रँड लीडर म्हणून  ओळख मिळाली. त्यानंतर ते हळूहळू एक युवा नेता म्हणून उदयास आले. सुखविंदर सिंह सुक्खू यांनी 1988 मध्ये एनएसयूआयच्या प्रदेशाध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतली. त्यानंतर 1995 मध्ये त्यांच्याकडे युवक काँग्रेसच्या प्रदेश सरचिटणीसपदाची धुरा मिळाली. 


Himachal CM : पहिली विधानसभा निवडणूक जिंकली
 
सक्खू यांनी हिमाचल प्रदेश युवक काँग्रेसचे प्रमुख म्हणून जवळपास दहा वर्षे काम केले. 2003 मध्ये त्यांनी पहिली विधानसभा निवडणूक नादौनमधून जिंकली. 2007 मध्ये त्यांनी विजयाची परंपरा कायम ठेवत दुसऱ्यांदा विजय मिळवला. परंतु, 2012 च्या विधानसभा निवडणुकीत त्यांचा पहिला पराभव झाला. यानंतर त्यांनी 2013 मध्ये हिमाचल प्रदेश काँग्रेसचे अध्यक्षपद स्वीकारले. जवळपास सहा वर्षे ते प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष होते. 2017 आणि 2022 च्या विधानसभेत त्यांना पुन्हा विजय मिळाला. 


Himachal CM : 40 वर्षांची राजकीय कारकीर्द
 
चार वेळा आमदार राहिलेले सक्खू हे दोन वेळा सिमला महानगरपालिकेचे प्रमुख म्हणून निवडून आले होते. आपल्या 40 वर्षांच्या राजकीय कारकिर्दीत सक्खू यांनी त्यांचे सरकार आणि सहा वेळा काँग्रेसचे मुख्यमंत्री वीरभद्र सिंह यांना घेरण्यास मागेपुढे पाहिले नाही. वेळोवेळी वेगवेगळ्या मुद्द्यांवर ते अनेकवेळा थेट भांडत असत. 


Himachal CM : राहुल गांधींशी चांगले संबंध  
सुखविंदर सिंह सुक्खू हे हिमाचल प्रदेशमधील हमीरपूरचे आहेत. त्यांचे काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यासोबत खूप जवळचे  संबंध असल्याचे बोलले जाते. या निवडणुकीत त्यांनी प्रियांका गांधी यांचा विश्वास जिंकण्याचे काम केले.


महत्वाच्या बातम्या


Himachal Government Formation: हिमाचलमध्ये काँग्रेसनं सत्ता स्थापन केली, सुखविंदर सिंह सुक्खू यांनी घेतली मुख्यमंत्रीपदाची शपथ