नवी दिल्ली स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला (14 ऑगस्ट, 2023), राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी देशाला संबोधित केले. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आपल्या भाषणात शेतकरी ते चांद्रयान मोहीम अशा विविध मुद्यांना स्पर्श केला. भारत ही लोकशाहीची जननी आहे, त्यामुळे स्वातंत्र्यदिन हा आपल्यासाठी अभिमानाचा दिवस असल्याचे त्यांनी म्हटले. 


राष्ट्रपती मुर्मू यांनी म्हटले की, , स्वातंत्र्य दिन आपल्याला याची आठवण करून देतो की आपण केवळ व्यक्ती नाही तर आपण एका महान समुदायाचा भाग आहोत जो आपल्या प्रकारचा सर्वात मोठा आणि जीवंत समुदाय आहे. हा जगातील सर्वात मोठ्या लोकशाहीतील नागरिकांचा समुदाय आहे. जात, पंथ, भाषा, प्रदेश याशिवाय आपली एक ओळख आपल्या कुटुंबाशी आणि कार्यक्षेत्राशी निगडित आहे. पण आपली एक ओळख आहे जी या सगळ्यांच्या वर आहे आणि ती म्हणजे आपली ओळख म्हणजे भारताचे नागरिक. आपण सर्व या महान देशाचे नागरिक आहोत. आपल्या सर्वांना समान संधी आणि अधिकार आहेत आणि आपली कर्तव्ये देखील समान असल्याचे राष्ट्रपतींनी म्हटले. 


गांधीजींनी भारताचा आत्मा जागृत केला


राष्ट्रपती म्हणाले, गांधीजी आणि स्वातंत्र्य लढ्यातील इतर महान नायकांनी भारताच्या आत्म्याला जागृत केले आणि आपल्या महान सभ्यतेची मूल्ये जनसामान्यांपर्यंत पोहोचवली. सत्य आणि अहिंसा हा आपल्या स्वातंत्र्य लढ्याची आधारशिला आहे. जगातीलन अनेक राजकीय संघर्षांमध्ये यशस्वीपणे अहिंसा आणि सत्य हे मूल्य  स्वीकारले गेले असल्याचे त्यांनी म्हटले. 


महिलांच्या योगदानाचे कौतुक


राष्ट्रपती मुर्मू म्हणाले की, आज महिला देशाच्या विकास आणि सेवेच्या प्रत्येक क्षेत्रात भरीव योगदान देत आहेत आणि देशाचा अभिमान वाढवत आहेत. आज आपल्या महिलांनी अशा अनेक क्षेत्रात विशेष स्थान निर्माण केले आहे ज्यात त्यांच्या सहभागाची काही दशकांपूर्वी कल्पनाही केली जात नव्हती. महिला सक्षमीकरणाला प्राधान्य देण्याचे आवाहन राष्ट्रपतींनी देशाला केले. 


आव्हानांचे संधीत रुपांतर 


देशाला उद्देशून केलेल्या भाषणात राष्ट्रपती मुर्मू यांनी म्हटले की, देशाने संकट, आव्हानांचे रुपांतर संधीत केले आहे. देशाने जीडीपीमध्ये चांगली वाढ केली आहे. अन्नदाता शेतकऱ्यांनी आपल्या आर्थिक विकासात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. देश शेतकऱ्यांचा ऋणी असल्याचे त्यांनी म्हटले. 


आदिवासींच्या स्थितीत सुधारणा


आदिवासींची स्थिती सुधारण्यासाठी आणि त्यांना प्रगतीच्या प्रवासात सामावून घेण्यासाठी विशेष कार्यक्रम राबविण्यात येत आहेत. मी माझ्या आदिवासी बंधू-भगिनींना आवाहन करतो की, तुम्ही सर्वांनी आपल्या परंपरा समृद्ध करताना आधुनिकतेचा अंगीकार करा. गरजूंना मदत करण्यासाठी विविध क्षेत्रात पुढाकार घेण्यात आला असून कल्याणकारी कार्यक्रम मोठ्या प्रमाणावर राबवले जात आहेत.



G20 मध्ये भारताची महत्त्वाची भूमिका


राष्ट्रपती मुर्मू यांनी म्हटले की, भारत संपूर्ण जगात विकासाची उद्दिष्टे आणि मानवतावादी सहकार्याला चालना देण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावत आहे. सहकार्याला चालना देण्यासाठी महत्वाची भूमिका बजावत आहे. भारताने आंतरराष्ट्रीय मंचांवर आघाडीचे स्थान निर्माण केले आहे आणि G20 देशांच्या अध्यक्षपदाची जबाबदारीही स्वीकारली आहे. G20 जगाच्या लोकसंख्येच्या दोन तृतीयांश लोकसंख्येचे प्रतिनिधित्व करत असल्याने, आमच्यासाठी जागतिक प्राधान्यक्रमांना योग्य दिशेने नेण्याची ही एक अनोखी संधी आहे.


चांद्रयान मोहीम भविष्यासाठी...


भारतीय अंतराळ संशोधन संस्था नवीन उंची गाठत आहे आणि नवे आयाम प्रस्थापित करत असल्याचे गौरवोद्गार राष्ट्रपतींनी आपल्या भाषणात काढले. चंद्राच्या कक्षेत प्रवेश केलेले चांद्रयान 3 इस्रोने प्रक्षेपित केले आहे. चंद्रावरची मोहीम आपल्या अंतराळातील भविष्यातील कार्यक्रमांसाठी फक्त एक पायरी आहे, आपल्याला अजून बराच पल्ला गाठायचा असल्याचेही त्यांनी सांगितले.