नवी दिल्ली : काही दिवसांपूर्वी पार पडलेल्या झारखंडच्या निवडणुकांमध्ये भाजपचा पराभव करत काँग्रेस आघाडीला स्पष्ट बहुमत मिळालं होतं. त्यामुळे भाजपच्या हातून महाराष्ट्र पाठोपाठ झारखंडही निसटलेलं आहे. त्यामुळे झारखंडमध्ये काँग्रेस आघाडीचं सरकार स्थापन करण्यात येणार आहे. झारखंड मुक्ती मोर्चाचे नेते हेमंत सोरेन आज झारखंडच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. आज दुपारी 2 वाजून 10 मिनिटांनी मोरहाबादी मैदानात आयोजित करण्यात आलेल्या शपथविधी सोहळ्यात झारंडचे मुख्यमंत्री म्हणून हेमंत सोरेन शपथ घेतील. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, झारखंड मुक्ती मोर्चाचे नेते हेमंत सोरेन यांच्याव्यतिरिक्त काँग्रेसकडून विधिमंडळ गटनेते आलमगीर आलम आणि रामेश्वर उरांवही मंत्रीपदाची शपथ घेण्यार आहेत. शपथविधी सोहळ्यात विरोधी पक्षांचे नेतेही उपस्थित असणार आहे.


कोणते नेते शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहणार?


माजी राष्ट्रपती प्रणब मुखर्जी, काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी, काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी, उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव, बिहारचे माजी मुख्यमंत्री तेजस्वी यादव, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत, छत्तीसगढचे मुख्यमंत्री भूपेश बघेल, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उपस्थित राहणार आहेत. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार शपथविधीला उपस्थित राहणार नसून शरद पवार जाणार नाही, राज्यात उद्या मंत्रिमंडळ विस्तार आणि नियोजित कार्यक्रमात व्यस्त असल्यानं जाणार नाही, अशी माहिती मिळत आहे.


याचबरोबर शरद यादव, डीएमके प्रमुख एम. के. स्टालिन, कनिमोझी, राज्यसभेचे उपसभापती हरिवंश, सीपीआय नेते कन्हैय्या कुमार, जीतन राम मांझी, काँग्रेस नेते केसी वेणुगोपाल, काँग्रेस नेते आरपीएन सिंह यांच्यासह अनेक नेते उपस्थित राहणार आहेत. एवढचं नाहीतर मायावती, एचडी कुमारस्वामी, आंध्रप्रदेशचे माजी मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू हे नेतेही उपस्थित राहणाची शक्यता आहे.


व्यस्त कार्यक्रमांमुळे पंतप्रधान मोदी अनुपस्थित : जेएमएम


झारखंड मुक्ती मोर्चाच्या प्रवक्ता आणि महासचिव सुप्रियो भट्टाचार्य यांनी सांगितले की, हेमंत सोरेन यांनी शपथविधी सोहळ्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनाही आमंत्रण दिलं आहे. परंतु, त्यांच्या व्यस्त कार्यक्रमांमुळे ते शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहू शकणार नाहीत. त्यांनी हेमंतर सोरेन यांना शुभेच्छआ दिल्या आहेत. तसेच पंतप्रधान म्हणाले की, वेळ मिळताच ते झारखंडमध्ये येणार आहे. हेमंत सोरेन यांनी काळजीवाहू मुख्यमंत्री रघुवर दास यांनाही फोन करून शपथविधी सोहळ्याचं आमंत्रण दिलं आहे. सोरेन यांचं आमंत्रण रघुवर दास यांनी स्विकारलं असून ते शपथविधीला उपस्थित राहणार आहेत.


असा होता झारखंड निवडणुकांचा निकाल


झारखंडमध्ये काँग्रेस आघाडीला 46 जागा मिळाल्या असून भाजपला अवघ्या 25 जागांवर समाधान मानावं लागलं आहे. काँग्रेस आघाडीत झारखंड मुक्ती मोर्चाला 28 जागा मिळाल्या असून काँग्रेसला 16 जागा मिळाल्या आहेत. झारखंडमध्ये 81 जागांवर मतदान झालं होतं. प्रचारात सत्ताधारी भाजप विरुद्ध झारखंड मुक्ती मोर्चा-काँग्रेस-राष्ट्रीय जनता दल यांच्या आघाडीत सरळ सामना झाला. बहुमतासाठी लागणारा 41 आकडा असून काँग्रेस आघाडीनं 46 जागांवर विजय मिळाला आहे. त्यामुळे काँग्रेस आघाडीचा सत्तास्थापनेचा मार्ग मोकळा झाला आहे.


दरम्यान, हेमंत सोरेन यांनी 23 डिसेंबर रोजी निवडणुकांचे परिणाम आल्यानंतर आपल्या मित्रपक्षांसोबत 24 डिसेंबरला राज्यपाल द्रौपदी मुर्मू यांच्याकडे सरकार स्थापनेचा दावा केला होता. त्यानंतर राज्यपालांनी त्यांना 29 डिसेंबरला शपथविधी सोहळ्यासाठी आमंत्रण दिलं.


संबंधित बातम्या : 


Jharkhand Election Results 2019 : महाराष्ट्रानंतर भाजपचं झारखंडमध्येही पानिपत, काँग्रेस-जेएमएम आघाडीला स्पष्ट बहुमत


भाजपसाठी धोक्याची घंटा... एका वर्षात पाच राज्यांतील गमावली सत्ता


Jharkhand Election Results 2019: दोन राज्य एक निकाल