Champai Soren CM Of Jharkhand :  हेमंत सोरेन (Hemant Soren) यांनी आपल्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर त्यांना ईडीने अटक केल्याची माहिती आहे. हेमंत सोरेन यांना हाऊस अरेस्ट केलं असून त्यामुळे झारखंडच्या राजकारणात मोठ्या उलथापालथी घडताना दिसत आहेत. हेमंत सोरेन यांच्यानंतर आता झारखंडची कमान ही चंपई सोरेन यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. 


झारखंडमधील कथित जमीन घोटाळ्याशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात ईडीने हेमंत सोरेन यांची चौकशी केली. यानंतर हेमंत सोरेन मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देण्यासाठी राजभवनात पोहोचले. दरम्यान, सत्ताधारी पक्षाचे आमदारही रांची येथील राजभवनात पोहोचले. चंपई सोरेन यांनी राज्यपालांची भेट घेऊन सरकार स्थापनेचा दावा केल्याचे सांगण्यात येत आहे. चंपई सोरेन यांना 41 हून अधिक आमदारांचा पाठिंबा आहे. 80 सदस्यीय विधानसभेत बहुमताचा आकडा 41 आहे.


कौटुंबिक विरोधामुळे कल्पना सोरेन मुख्यमंत्री बनू शकल्या नाहीत


हेमंत सोरेन यांना अटक होणार हे निश्चित झाल्यानंतर त्यांनी त्यांच्या पत्नी कल्पना सोरेन यांच्याकडेम मुख्यमंत्रीपदाची सूत्रं देण्यासाठी हालचाल सुरू केली. पण हेमंत सोरेन यांचे लहान बंधू आणि हेमंत सोरेन यांच्या मोठ्या भावाची पत्नी सीता सोरेन यांच्या विरोधामुळे कल्पना सोरेन मुख्यमंत्री बनू शकल्या नाहीत असं सांगण्यात येतंय. 


झारखंडमधील पक्षीय बलाबल कसं आहे? 


81 सदस्यीय झारखंड विधानसभेत सत्ताधारी आघाडीचे 48 आमदार आहेत. यामध्ये हेमंत सोरेन यांच्या झारखंड मुक्ती मोर्चाकडे 29, काँग्रेसकडे 17, RJD कडे एक आणि CPI (ML) कडे एक आमदार आहे.


विरोधी पक्ष एनडीएकडे 32 आमदार आहेत. यामध्ये भाजप 26, AJSU 3, NCP (AP) 1 आणि 2 अपक्ष आमदारांचा समावेश आहे. तसेच एक जागा रिक्त आहे.


झारखंड जमीन घोटाळ्याचं नेमकं प्रकरण काय? 


ईडीनं रांचीमध्ये लष्कराच्या ताब्यात असलेल्या 4.55 एकर जमिनीच्या बेकायदेशीर खरेदी-विक्रीची चौकशी सुरू केली आहे. या प्रकरणी ईडीनं रांचीच्या बडागाईन झोनचे महसूल उपनिरीक्षक भानू प्रताप प्रसाद यांना अटक केली होती. त्यांच्या राहत्या घरातून मोठ्या प्रमाणात सरकारी कागदपत्रं आणि मोबाईलही त्यावेळी जप्त करण्यात आले होते. त्यानंतर ईडीने आपला मोर्चा हेमंत सोरेन यांच्याकडे वळवला. 


प्रदीप बागची, विष्णू कुमार अग्रवाल, भानू प्रताप प्रसाद आणि इतरांविरुद्ध झारखंड पोलीस आणि पश्चिम बंगाल पोलिसांनी दाखल केलेल्या अनेक एफआयआरच्या आधारे ईडीनं मनी लॉन्ड्रिंग कायद्याच्या कलमांखाली गुन्हा नोंदवला. या प्रकरणाचा तपास पुढे जात असताना ईडीनं आतापर्यंत 14 आरोपींना अटक केली आहे. या आरोपींनी सरकारी अधिकाऱ्यांच्या संगनमतानं भूमाफियांच्या नावे फसवणूक करून भूखंड हस्तांतरित केल्याचं तपासात उघड झालंय.


अटक करण्यात आलेल्या 14 आरोपींमध्ये प्रदीप बागची, अफसर अली, सद्दाम हुसेन, इम्तियाज अहमद, तल्हा खान, फैयाज खान, भानू प्रताप प्रसाद, छवी रंजन, आयएएस (माजी डीसी रांची) दिलीप कुमार घोष, अमित कुमार अग्रवाल, विष्णू कुमार अग्रवाल यांचा समावेश आहे. जमीन घोटाळ्याप्रकरणी केंद्रीय तपास यंत्रणेनं आतापर्यंत 236 कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीची मालमत्ता जप्त केली आहे.


ही बातमी वाचा: