Champai Soren : झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन (Hemant Soren) यांनी राजीनामा दिला असून चंपाई सोरेन हे नवीन मुख्यमंत्री असतील. आमदारांच्या बैठकीत त्यांची विधिमंडळ पक्षनेतेपदी निवड करण्यात आली. चंपाई सोरेन हे हेमंत सोरेन यांच्या अत्यंत जवळचे मानले जातात.
जमिनी घोटाळ्याप्रकरणी झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांची ईडीकडून चौकशी करण्यात आली असून हेमंत सोरेन यांना अटक होण्याची दाट शक्यता आहे. त्या पार्श्वभूमीवर हेमंत सोरेन यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला. चंपई सोरेन हे झारखंडचे नवे मुख्यमंत्री होणार असून थोड्याच वेळात राज्यपाल त्यांना मुख्यमंत्रीपदाची शपथ देतील. तर कोणत्याही क्षणी हेमंत सोरेन यांना ईडीकडून अटक होण्याची शक्यता आहे.
हेमंत सोरेन यांनी राजभवन गाठून राज्यपालांकडे राजीनामा सुपूर्द केला. याआधी हेमंत सोरेन यांच्या पत्नी कल्पना सोरेन यांचे नाव मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत होते. मात्र कुटुंबातून विरोधाचा आवाज उठवला जात होता. दरम्यान, JMM, काँग्रेस आणि RJD विधीमंडळ पक्षाच्या बैठकीत चंपाई सोरेन यांची नेतेपदी निवड करण्यात आली आहे.
चंपाई सोरेन हे सरायकेला मतदारसंघाचे आमदार आहेत असून सध्या परिवहन, अनुसूचित जमाती, अनुसूचित जाती आणि मागासवर्गीय कल्याण मंत्री आहेत. ते झारखंड मुक्ती मोर्चाचे उपाध्यक्षही आहेत. चंपाई सोरेन हे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांचे विश्वासू मानले जातात.
हेमंत सोरेन यांच्या पत्नी कल्पना मुख्यमंत्री होऊ शकतात अशी अटकळ बांधली जात होती. मात्र विधिमंडळ पक्षाच्या बैठकीनंतर चंपाई सोरेन यांच्याकडे मुख्यमंत्रिपदाची कमान सोपवण्यात आली.
हेमंत सोरेन यांना अटक होणार
जमीन घोटाळ्याप्रकरणी चौकशी सुरू असणाऱ्या हेमंत सोरेन यांना कधीही अटक होऊ शकते. अशा प्रकारे अटक होणारे ते झारखंंडचे तिसरे मुख्यमंत्री असतील.
झारखंडमधील पक्षीय बलाबल कसं आहे?
81 सदस्यीय झारखंड विधानसभेत सत्ताधारी आघाडीचे 48 आमदार आहेत. यामध्ये हेमंत सोरेन यांच्या झारखंड मुक्ती मोर्चाकडे 29, काँग्रेसकडे 17, RJD कडे एक आणि CPI (ML) कडे एक आमदार आहे.
विरोधी पक्ष एनडीएकडे 32 आमदार आहेत. यामध्ये भाजप 26, AJSU 3, NCP (AP) 1 आणि 2 अपक्ष आमदारांचा समावेश आहे. तसेच एक जागा रिक्त आहे.
ही बातमी वाचा :