IMD Rain Update : देशातील अनेक राज्यांमध्ये दोन दिवसांपासून मुसळधार पावसाने (Rain) जोर धरला आहे. सगळीकडे पडलेल्या मुसळधार पावसाने नागरिकांचे प्रचंड हाल झाले आहेत. संततधार पावसामुळे देशातील विविध भागांत आतापर्यंत जवळपास 20 जणांना जीव गमवावा लागला आहे. पावसाचा अंदाज घेता येत्या काही दिवसांत आणखी मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये पुढील 24 तासांसाठी रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.
जुलैच्या पहिल्या आठ दिवसांत झालेल्या पावसाने देशभरात पावसाची कमतरता भरून काढली, असे हवामान खात्याने रविवारी (9 जुलै) सांगितले. आतापर्यंत एकूण 243.2 मिमी पाऊस झाला असून, तो सरासरीपेक्षा दोन टक्के अधिक आहे. राजधानी दिल्लीत दोन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे अनेक भागांत पाणी साचले आहे.
दिल्लीत शाळेला सुट्टी जाहीर
सलग दोन दिवसांपासून होणाऱ्या पावसामुळे राजधानी दिल्लीतील शाळांनाही सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी ट्विट केले की, दिल्लीत गेल्या 2 दिवसांपासून सुरू असलेला मुसळधार पाऊस आणि हवामान खात्याने दिलेला इशारा लक्षात घेऊन आज दिल्लीतील सर्व शाळा एका दिवसासाठी बंद ठेवण्यात आल्या आहेत.
40 वर्षांचा विक्रम मोडला
रविवारी सकाळी 8.30 वाजेपर्यंत दिल्लीत गेल्या 24 तासांत 153 मिमी पाऊस पडला. या पावसाने गेल्या 40 वर्षांचा विक्रम मोडला आहे. 1982 नंतरच्या जुलै महिन्यातील एका दिवसातील हा सर्वाधिक पाऊस आहे. वेस्टर्न डिस्टर्बन्स आणि मान्सून वारे यांच्यातील संवादामुळे दिल्लीसह उत्तर-पश्चिम भारतात मुसळधार पाऊस पडत आहे. येथील अनेक भागांत मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. दिल्लीत पावसामुळे घराचे छत कोसळल्याने एका 58 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला आहे.
खासदारांच्या घरातही पाण्याचा शिरकाव
दिल्लीत मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साचले होते. खासदार रामगोपाल यादव यांच्याही घरात पावसाने शिरकाव केला. मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी दिल्लीच्या एलजीशी संवाद साधून माहिती घेतली. गृहमंत्र्यांनी जम्मू आणि काश्मीरच्या एलजीशी देखील बोलले आणि अतिवृष्टीमुळे स्थगित झालेल्या अमरनाथ यात्रेची माहिती घेतली. या पावसामुळे डोंगराळ भागांत, तिथल्या राज्यांत सर्वाधिक नुकसान होत आहे.
डोंगराळ भागांत पावसामुळे नुकसान
हिमाचल प्रदेशातील रामपूरमध्ये सतलज नदीच्या पाण्याची पातळी वाढल्यानंतर नाथपा धरणातून 1500 क्युसेक पाणी सोडण्यात आले आहे. राज्यात सतत पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे कांगडामध्ये रस्त्याची दुरावस्था झाली आहे. सतलज नदीच्या पाण्याची पातळी वाढल्याने शिमल्यातील चाबा पूल वाहून गेला आहे.
कुल्लूच्या कसोल भागात मुसळधार पावसामुळे आलेल्या पुरात अनेक गाड्या वाहून गेल्या आहेत. पावसामुळे मंडईतील औट-बंजारचा वर्षानुवर्ष जुना पूल कोसळला आहे. मंडईतील बियास नदीच्या पाण्याची पातळी वाढल्याने पंचवक्त्र मंदिरही त्यात बुडाले आहे.
हिमाचलमध्ये अतिवृष्टीमुळे पाच जणांचा मृत्यू
शिमला जिल्ह्यातील कोठगढ भागात भूस्खलनामुळे एक घर कोसळल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. यामध्ये कुटुंबातील तिघांचा मृत्यू झाला. कुल्लू शहरातही भूस्खलनामुळे एका तात्पुरत्या घराचे नुकसान झाले असून त्यात एका महिलेचा मृत्यू झाला आहे. दुसर्या अपघातात, चंबा तहसीलमधील कटियान येथे शनिवारी रात्री भूस्खलनाच्या खाली एका व्यक्तीचा मृत्यू झाला.
पर्यटकांना आवाहन
या संदर्भात कुलूचे डीसी आशुतोष गर्ग म्हणाले की, कालपासून संपूर्ण जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे अत्यावश्यक सेवांवर परिणाम झाला आहे. अनेक रस्ते, प्रमुख राष्ट्रीय महामार्ग बंद आहेत. तसेच, त्यांनी यावेळी पर्यटकांना विनंती केली की, जोपर्यंत सर्व कामे सुरळीत पार पडत नाहीत तोपर्यंत पर्यटकांनी तिथेच थांबावे. तसेच, ज्यांना सहलीसाठी इथे यायचे असेल त्यांनी आपली सहल पुढे ढकलावी.
हिमाचल प्रदेशातील कांगडा, चंबा, हमीरपूर, कुल्लू, मंडी येथे मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. सोलन, शिमला, सिरमौरमध्ये ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला असून लाहौल स्पितीमध्ये यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. लाहौल स्पितीच्या लोसारमध्ये हिमवृष्टीमुळे तापमानात मोठी घट नोंदवण्यात आली आहे.
जम्मू-काश्मीरमध्येही बिकट परिस्थिती
जम्मू-काश्मीरमधील रामबन येथील पंथ्याल येथे टी-5 बोगद्याजवळ रस्ता वाहून गेला असून महामार्ग बंद करण्यात आला आहे. नागरिकांना ये-जा करण्यासाठी पर्यायी मार्ग तयार करण्यात आले आहेत. लेफ्टनंट गव्हर्नर मनोज सिन्हा यांनी काश्मीरमधील झिरो ब्रिजला भेट दिली आणि पाटबंधारे आणि पूर नियंत्रण विभागाच्या अधिकाऱ्यांशी संवाद साधला. जम्मू-काश्मीरमध्ये रविवारी सलग तिसऱ्या दिवशी मुसळधार पावसामुळे कठुआ आणि सांबा जिल्ह्यांसाठी तसेच खालच्या पाणलोट क्षेत्रासाठी रेड अलर्ट जारी करण्यात आला होता.
रेड अलर्ट जारी
नद्या आणि नाल्यांमधील पाण्याची पातळी धोक्याचे चिन्ह ओलांडत असल्याच्या अहवालानंतर IMD ने हा इशारा जारी केला आहे. विभागाच्या प्रवक्त्यांनी सांगितले की, कठुआ, सांबा, जम्मू आणि काश्मीरच्या खालच्या पाणलोट क्षेत्रासाठी रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. कारण पूर येण्याचा धोका वाढला आहे. येत्या 24 तासांत सर्व संबंधितांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
जम्मू-काश्मीरमधील रामबनमधील मेहर भागात मुसळधार पावसामुळे अमरनाथ यात्रेकरूंसाठी असलेला लंगर सेवेचा तंबू वाहून गेला आहे. यात्रेला लवकरात लवकर सुरुवात करण्याचा आमचा प्रयत्न असल्याचे वरिष्ठ पोलीस अधीक्षक मोहिता शर्मा यांनी सांगितले. चिनाब नदीचा प्रवाह तुटत असून त्यामुळे भेगा पडल्या आहेत. हे आमच्या लक्षात येताच आम्ही लंगर प्राधिकरणाला तेथून माघार घेण्यास सांगितले होते. तो दुसऱ्या ठिकाणी हलवण्याच्या प्रक्रियेत आहे. जे लोक तेथे अन्न घेत होते ते सर्व वाचले आहेत असेही ते म्हणाले.
उत्तराखंडमध्ये आठ जणांचा मृत्यू
उत्तराखंडची परिस्थिती सुद्धा सारखीच आहे. राज्यात गेल्या 24 तासांत सरासरीपेक्षा 2.5 ते 3 पट जास्त पाऊस झाला आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यांना रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. दरड कोसळण्याची शक्यता असल्याने सरकारने लोकांना सावधगिरीने प्रवास करण्याचे आवाहन केले आहे. 11-12 जुलैसाठी, कुमाऊं आणि त्याच्या लगतच्या गढवाल, चमोली भागात अति मुसळधार पावसाची शक्यता आहे.
उत्तराखंडमध्ये रविवारी झालेल्या मुसळधार पावसात भूस्खलनामुळे वाहनांचे अपघात आणि घरांची पडझड होऊन आठ जण ठार झाले, तर सहा जण जखमी झाले अशी माहिती संबंधित अधिकाऱ्यांनी वृत्तसंस्थांना दिली. खराब हवामानाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी प्रशासनाला सतर्क राहण्याच्या सूचना देत लोकांना अनावश्यक हालचाली टाळण्यास सांगितले आहे. अनेक ठिकाणी दरड कोसळल्याने रस्ते बंद झाले असून त्यामुळे जनजीवन विस्कळीत होत असून चार धाम यात्रेलाही अडथळा निर्माण होत आहे.
नद्यांना वेग आला आहे
सततच्या पावसामुळे गंगा नदीसह राज्यातील प्रमुख नद्यांच्या पाणीपातळीतही वाढ झाली आहे. टिहरी गढवाल जिल्ह्यातील मुनी की रेती भागात केदारनाथहून परतणारी एक जीप भूस्खलनाच्या तडाख्यात नियंत्रणाबाहेर गेली आणि गंगा नदीत पडली, त्यात सहा यात्रेकरूंचा बुडून मृत्यू झाला. राज्य आपत्ती प्रतिसाद दलाचे (एसडीआरएफ) निरीक्षक कविंद्र सजवान यांनी सांगितले की, गोताखोरांच्या मदतीने अपघातात बळी पडलेल्या तीन यात्रेकरूंचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहे, तर इतर तिघांच्या शोधासाठी मोहीम राबवली जात आहे.
हरियाणा, पंजाब, चंदीगडमध्येही मुसळधार पाऊस
हरियाणा, पंजाब, चंदीगडमध्ये पावसाचा कहर पाहायला मिळत आहे. चंदीगडच्या मोहालीमध्ये संततधार पावसामुळे डेरा बस्सी शहरातील गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये पाणी साचले आहे. पाणी साचल्याने वाहने पाण्याखाली गेली होती. राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाचे पथक घटनास्थळी हजर आहेत. डेरा बस्सीचा गुलमोहर विस्तार जलमय झाला आहे. NDRF ने सुमारे 82-85 लोकांना वाचवले आहे.
चंदीगडचे IMD शास्त्रज्ञ अजय कुमार सिंह यांनी सांगितले की, काल सकाळी 8 ते आज सकाळी 8 वाजेपर्यंत चंदीगडमध्ये 302.2 मिमी विक्रमी पावसाची नोंद झाली आहे. हरियाणा आणि पंजाबच्या जवळपास प्रत्येक जिल्ह्यात पाऊस पडत आहे. येत्या 24 तासांत मान्सूनही पूर्णपणे सक्रिय होणार आहे. त्यानंतर पावसाचा जोर कमी होईल. हरियाणातील पंचकुला येथील मोर्नी हिल्स येथे मुसळधार पावसामुळे भूस्खलन झाले.
गुरुग्राममध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने शाळा बंद
दिल्लीला लागून असलेल्या गुरुग्राममध्ये मुसळधार पाऊस पडत आहे. मुसळधार पावसामुळे अनेक भागात पाणी साचले आहे. नागरी प्राधिकरणाची पथके पाण्याचा निचरा करण्यात गुंतलेली आहेत. आवश्यक काम असेल तेव्हाच सर्वांनी घराबाहेर पडावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे. याशिवाय गुरुग्राम जिल्हा प्रशासनाने एक सल्लागार जारी करून सांगितले की, गुरुग्राम जिल्ह्यात येणार्या सर्व सरकारी आणि खाजगी शाळा 10 जुलै रोजी बंद ठेवण्याचे निर्देश दिले आहेत.
राजस्थानमध्ये विद्यार्थ्याचा मृत्यू
राजस्थानच्या काही भागांत पाऊस सुरूच आहे आणि कालपासून रविवारी सकाळपर्यंत राज्यातील झुंझुनूच्या उदयपुरवती येथे सर्वाधिक 12 सेमी पावसाची नोंद झाली. यादरम्यान काही भागात मुसळधार ते अतिवृष्टी तर अनेक भागात मध्यम ते मुसळधार पाऊस झाला. सीकर शहरात पावसाच्या पाण्याने भरलेल्या खड्ड्यात पडून 17 वर्षीय विद्यार्थ्याचा मृत्यू झाला. सीकरचे पोलीस अधीक्षक करण शर्मा यांनी सांगितले की, नवलगढ रस्त्यावर सीवरेजच्या कामासाठी खड्डा खोदण्यात आला होता, त्यात पावसाचे पाणी तुंबले.
उत्तर प्रदेशात दोघांचा मृत्यू
उत्तर प्रदेशातही नैऋत्य मान्सून जोरात सुरू आहे. रविवारी राज्यात मोठ्या प्रमाणात मुसळधार पावसाची नोंद झाली. गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे नद्यांच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे. केंद्रीय जल आयोगाच्या अहवालानुसार, राज्यातील गंगा, रामगंगा, यमुना आणि राप्तीसह नद्यांच्या पाण्याची पातळी वाढली असली तरी ती अजूनही धोक्याच्या चिन्हाखाली आहे.
उत्तर प्रदेशातील मुझफ्फरनगर जिल्ह्यात रविवारी पहाटे झालेल्या मुसळधार पावसामुळे घराचे छत कोसळून एक महिला आणि सहा वर्षांची मुलगी ठार झाली, तर महिलेचा नवरा जखमी झाला. राज्यातील एकूण 75 जिल्ह्यांपैकी सुमारे 68 जिल्ह्यांमध्ये पावसाची नोंद झाली आहे. पश्चिम उत्तर प्रदेशातील जिल्ह्यांमध्ये राज्याच्या मध्य आणि पूर्वेकडील जिल्ह्यांपेक्षा जास्त पाऊस झाला. तर, ईशान्येकडील आसाम राज्यात सुरू असलेल्या संततधार पावसामुळे डिकारी नदीच्या पाण्याची पातळी वाढल्याने धेमाजीच्या अनेक गावात पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे.