हाथरस (उत्तर प्रदेश) : हाथरसमधील सामूहिक अत्याचार प्रकरणातील 19 वर्षीय पीडितेचा दिल्लीच्या सफदरजंग हॉस्पिटलमध्ये मृत्यू झाला. या घटनेनंतर देशभरात संताप व्यक्त केला जात आहे. पीडितेला न्याय देण्याच्या मागणीसाठी देशभर आंदोलन केली जात आहेत. माध्यमांना या गावात जाण्यासाठी प्रशासनाकडून बंदी घालण्यात येत आहे. या प्रशासनाच्या भूमिकेच्या विरोधात एबीपी न्यूजच्या रिपोर्टर प्रतिमा मिश्रा यांनी तिथंच ठिय्या आंदोलन सुरु केलंय. सध्या #ABPKoMatRoko हा हॅशटॅग ट्रेंडिंग आहे. एबीपी न्यूजच्या रिपोर्टर प्रतिमा मिश्राला रिपोर्टिंग करण्यापासून रोखलं गेलं. तिने तिथेच ठिय्या दिला आहे.


एबीपी न्यूज हाथरसमध्ये सातत्यानं रिपोर्टिंग करत आहे. मात्र, पीडितेच्या परिवाराशी संपर्क करु दिला जात नाही. तसंच माध्यमांना गावात जाण्यापासून रोखलं जात आहे. तिथं वार्तांकन करणाऱ्या एबीपीच्या रिपोर्टर प्रतिमा मिश्रा यांना रोखण्यात आलं तसंच कॅमेरापर्सनला देखील पोलिसांकडून धक्काबुक्की करण्यात आली.


यूपी पोलिसांनी हाथरसमध्ये एबीपी न्यूजच्या टीम अजूनही रोखून ठेवलं आहे. एबीपी न्यूजची टीम पीडितेच्या कुटुंबाला भेटू देण्याची वारंवार विनंती करत आहे. मात्र, पोलिसांनी कड तयार केलं असून पुढे जाऊ देत नाही. सकाळी यूपी पोलिसांनी रिपोर्टर प्रतिमा मिश्रा सोबत गैरवर्तन केलं. त्यानंतर एबीपी न्यूजची 15 लोकांची टीम हाथरसमध्ये पीडितेच्या कुटुंबाची बाजू दाखवण्यासाठी पोहचली आहे.





एडिशनल एसपी प्रकाश कुमार म्हणाले, एसआयटीकडून (SIT) तपास होईपर्यंत माध्यमांवर बंदी लावण्यात आहे. एसआयटीचा तपास पूर्ण झाल्यानंतर माध्यमांना जाण्याची परवानगी दिली जाणार आहे. जोपर्यंत एसआयटीचा तपास करत आहे. अधिकाऱ्यांचा जबाब घेतला जात आहे. त्यामुळे तपासावर कुठलाही परिणाम होऊ नये म्हणून राजकीय नेते आणि माध्यमांना जाण्यासाठी बंदी घालण्यात आली आहे.


अलाहाबाद हायकोर्टाच्या लखनौ खंडपीठाकडून हाथरस प्रकरणी सुमोटो दाखल; योगी प्रशासनाला नोटीस


महाराष्ट्रात पडसाद

या प्रकरणाचे राज्यातही पडसाद पाहायला मिळाले. विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी हल्लाबोल करत, भारतात लोकशाही जीवंत आहे का? लोकशाहीचा चौथा स्तंभ पत्रकारिता आहे. आणि भारतातील उत्तर प्रदेशमध्ये पत्रकारितेसोबत असं घडतंय. हाच न्यू इंडियाची घोषणा होती? मी पत्रकार प्रतिमा मिश्रा यांना सलाम करतो. ज्यांनी सत्य दाखवण्याची हिंमत केली.