लखनौ : सध्या उत्तरप्रदेशमधील हाथरस, बलरामपूरमध्ये अत्याचाराच्या घटनांनी देशभरात संताप व्यक्त केला जात आहे. उत्तर प्रदेशातील हाथरस घटनेवरुन संताप व्यक्त होत असतानाच आता उत्तर प्रदेशातील एका आमदाराने या प्रकरणी वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. चांगले संस्कारच बलात्कार रोखू शकतात असं वक्तव्य भाजपचे बलियाचे आमदार सुरेंद्र सिंह यांनी केलं आहे.


या संदर्भात त्यांचा एक व्हिडीओ व्हायरल होतोय. आमदार सुरेंद्र सिंह यांनी म्हटलं आहे की, मी फक्त एक आमदार नाही तर एक चांगला शिक्षकही आहे. त्यामुळे मी हे सांगतो आहे की आपल्या मुलींवर चांगले संस्कार घडवा. फक्त सरकार आणि तलवारीनं बलात्कारासारख्या घटना रोखू शकत नाहीत. तर चांगले संस्कार बलात्कार रोखू शकतात. गुन्ह्यांवर वचक ठेवणं हे सरकारचं काम आहे यात शंकाच नाही. मात्र मुलींवर चांगले संस्कार घडवणं त्यांना शालीन राहण्यास शिकवणं हे आई वडिलांचं कर्तव्य आहे, असं वादग्रस्त वक्तव्य सुरेंद्र सिंह यांनी केलंय. जिथं सरकारचा धर्म सुरक्षा करण्याचा आहे तसा परिवाराचा धर्म आहे संस्कार देण्याचा.  सरकार आणि संस्कार मिळून भारताला सुंदर बनवू शकतात, असं सुरेंद्र सिंह यांनी म्हटलं आहे.


तर दुसरे एक भाजप नेते रणजीत बहादूर श्रीवास्तव यांनी देखील मुलींबाबत वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. मुली ऊस, बाजरी आणि मक्याच्या शेतात गवत कापायला का जातात? या मुलींना एकांतात गवत कापायचं असतं त्यावेळी त्यांना ऊस, मका, बाजरीचचं शेत दिसतं का? दुसरीकडे त्यांना गवत मिळत नाही का? असं वक्तव्य श्रीवास्तव यांनी केलंय.


या दोन्ही भाजप नेत्यांच्या वादग्रस्त वक्तव्यानंतर समाजमाध्यमात संताप व्यक्त केला जात आहे.



राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांनी घेतली हाथरसमध्ये  पीडितेच्या कुटुंबियांची भेट
काँग्रेसचे नेते आणि खासदार राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांनी शनिवारी सायंकाळी हाथरसमध्ये  पीडितेच्या कुटुंबियांची भेटी घेतली. राहुल आणि प्रियंकाने पीडितेचा भाऊ, वडील आणि आईशी बंद खोलीत सुमारे एक तास संवाद साधला. यावेळी काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरीही त्यांच्यासमवेत तेथे होते. या भेटीनंतर या परिवारानं उपस्थित केलेले पाच प्रश्न प्रियांका गांधी यांनी योगी सरकारला विचारले आहेत.पीडित परिवाराच्या म्हणण्यानुसार त्यांच्यासोबत सर्वात वाईट वागणूक डीएमनी केली आहे. त्यांना कोण वाचवत आहे? त्यांना तात्काळ निलंबित करावं. आणि सर्व प्रकरणात त्यांच्या भूमिकेची देखील चौकशी करावी. जर पीडित परिवार न्यायिक चौकशीची मागणी करत असेल तर सीबीआय चौकशीची बोंब मारत एसआयटी चौकशी सुरु आहे, असं प्रियांका गांधी यांनी म्हटलंय. यूपी सरकार झोपेतून जागे झाले असेल तर पीडित परिवाराची मागणी त्यांनी पूर्ण करावी, असंही प्रियांका यांनी म्हटलं आहे.


हाथरसचे पोलीस अधीक्षक विक्रांत वीर सिंह, क्षेत्राधिकारी (सीओ) राम शब्द, पोलीस निरीक्षक दिनेश कुमार वर्मा, उपनिरीक्षक जगवीर सिंग आणि महेश पाल यांना निलंबित करण्यात आले आहे. हाथरस प्रकरणात मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी प्राथमिक चौकशी अहवालाच्या आधारे ही कारवाई केली आहे. तसेच या प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्याचे आदेश देखील मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दिले आहेत.


देशात महिलांवरील अत्याचारात वाढ
सरकारच्या एका ताज्या आकडेवारीनुसार 2019 साली भारतात दर दिवशी सरासरी 79 खूनाची प्रकरणे घडतात तर अपहरणासंबंधीत घडणाऱ्या गुन्ह्यांपैकी 66 टक्के गुन्हे ही बालकांशी संबंधीत आहेत. नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोच्या (NCRB) आकडेवारीनुसार 2019 साली खूनाची एकूण 28,918 प्रकरणे नोंदली गेली. 2018 (29,017) सालच्या तुलनेत हा दर 0.3 टक्क्यांनी घसरला आहे. या नव्या आकडेवारीतून देशात महिलांवरील अत्याचारात वाढ झालेली दिसून आले आहे. 2019 साली महिलांसंबंधी 4,05, 861 गुन्हे नोंदवण्यात आली होती जी 2018 च्या तुलनेत 7 टक्क्यांनी जास्त असल्याचं दिसून आलंय. तर दरदिवशी बलात्काराच्या सरासरी 87 गुन्ह्यांची नोंद झाल्याची धक्कादायक माहिती या आकडेवारीतून समोर आली आहे. 2019 साली एकूण 32,033 गुन्हे बलात्कारासंबंधी नोंद झाली आहेत. यात राजस्थान प्रथम तर उत्तर प्रदेश दुसऱ्या क्रमांकावर आहे.


संबंधित बातम्या