हाथरस: उत्तर प्रदेशच्या हाथरसमधील सामूहिक अत्याचार प्रकरणातील 19 वर्षीय पीडितेचा मंगळवारी सकाळी दिल्लीच्या सफदरजंग हॉस्पिटलमध्ये मृत्यू झाला. मृत्यूनंतर पीडितेचं अंत्यसंस्कार तिच्या परिवाराचं म्हणणं न ऐकता पोलिसांनीच केले असल्याचा आरोप नातेवाईकांनी केले. तसंच काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी देखील यासंदर्भात एक व्हिडीओ शेअर करत सरकारवर आरोप केले आहेत. हाथरसमधील अत्याचार पीडितेच्या मृत्यूनंतर देशभरात अनेक ठिकाणी आंदोलनं केली जात असून आरोपींना कडक शिक्षा व्हावी, अशी मागणी केली जात आहे.  हाथरस प्रकरणी SIT कडून चौकशी सुरु केली आहे. एसआयटीनं पीडित परिवाराची भेट घेतली आहे. सात दिवसात एसआयटीला रिपोर्ट सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.


पीडित परिवाराची भेट घेणार राहुल आणि प्रियांका गांधी
आज या पीडित परिवाराला राहुल आणि प्रियांका गांधी भेट देणार आहेत. या पार्श्वभूमीवर हाथरस बॉर्डर सील केली आहे. जिल्ह्यात 144 कलम लागू करण्यात आलं आहे. पाच किंवा त्यापेक्षा अधिक लोकांना एकत्रित येण्यास बंदी घातली आहे. राहुल आणि प्रियांका गांधी आज पीडित परिवाराची भेट घेऊन सांत्वन करणार आहेत.


दरम्यान मीडियाला पीडितेच्या गावात जाण्यासाठी बंदी घातली आहे. पोलिसांचं म्हणणं आहे की, मीडियामुळं तपास करण्यात अडचणी येत आहेत. त्यामुळं त्यांना गावात जाऊ दिलं जात नाही. दरम्यान नोएडा DND फ्लायवेवर देखील सुरक्षा वाढवली आहे. राहुल गांधी आणि प्रियांका गांधी 11 वाजता हाथरससाठी निघणार असल्याची माहिती आहे.


हाथरस अत्याचार पीडितेच्या मृत्यूनंतर पोलिसांकडून बळजबरीने अंत्यसंस्कार, राहुल गांधींकडून व्हिडीओ पोस्ट


ट्वीट करत राहुल गांधींचा हल्लाबोल 


'भारत की बेटी' वर अत्याचार करुन हत्या केली जाते. सत्य लपवलं जातंय आणि शेवटी तिच्या परिवाराचा अंत्यसंस्कार करण्याचा हक्क देखील हिरावला जातोय, असं ट्वीट राहुल गांधींनी एक व्हिडीओ शेअर करत केलंय. युपीतील वर्ग-विशेष जंगलराजने आणखी एका तरुणीची हत्या केली. ही फेक न्यूज आहे असं सांगत सरकारने पीडितेला मरण्यासाठी सोडून दिलं. दुर्दैवाने ही घटना फेक न्यूज नव्हती, ना पीडितेचा मृत्यू आणि ना सरकारची क्रूरता, असं ट्विट करत राहुल गांधी यांनी सरकारवर टीका केली.





आमची दिशाभूल केली जातेय- पीडितेचा भाऊ


सफदरजंगमध्ये धरणे आंदोलन करणाऱ्या पीडितेच्या परिवाराला काल पोलिसांनी तिथून हटवलं. परिवाराकडून आरोपींना फाशीची शिक्षा देण्याची मागणी करत हॉस्पिटलसमोर आंदोलन सुरु केलं होतं. पीडितेच्या भावाचं म्हणणं आहे की, आमची दिशाभूल केली जात आहे. आम्हाला न्याय हवा आहे. हॉस्पिटलबाहेर काँग्रेस, भीम आर्मी आणि अन्य संघटनांनी देखील आंदोलनं केली. भीम आर्मीचे प्रमुख चंद्रशेखर आझाद यांनी म्हटलं आहे की, या प्रकरणी न्याय व्हावा, हे प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवावं, असं त्यांनी म्हटलं आहे.


Hathras Case : हाथरस प्रकरणावरुन महाराष्ट्रातलं राजकारण तापलं, आरोप प्रत्यारोपांच्या फैरी


 SIT कडून चौकशी सुरु 


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या प्रकरणी लवकर तपास करुन आरोपींवर कडक कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. याबाबत पंतप्रधान यांनी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याशी फोनद्वारे संवाद साधला. दरम्यान योगी आदित्यनाथ यांच्या निर्देशानंतर हाथरस प्रकरणी SIT कडून चौकशी सुरु केली आहे. एसआयटीनं पीडित परिवाराची भेट घेतली आहे. सात दिवसात एसआयटीला रिपोर्ट सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.


19 वर्षाच्या मुलीसोबत रेप आणि हत्या 
माहितीनुसार यूपीच्या हाथरस जिल्हातील एका गावात 14 सप्टेंबर रोजी 19 वर्षीय मुलीवर अत्याचार केल्याची घटना घडली. घटनेनंतर पीडितेला अलीगडच्या जेएन मेडिकल कॉलेज हॉस्पिटलमध्ये भर्ती करण्यात आलं. सोमवारी तिची प्रकृती गंभीर असल्यानं तिला उपचारासाठी दिल्लीला आणलं. मात्र मंगळवारी उपचारादरम्यान तिचा दुर्देवी मृत्यू झाला. यूपी सरकारने पीडितेच्या कुटूंबासाठी 10 लाख रुपयांच्या मदतीची घोषणा केली आहे.