नवी दिल्ली : देशातील 17 प्रकारच्या करांना आणि विविध सेसना एका सूत्रात बांधणारी जीएसटी प्रणाली लागू झाली आहे. मात्र याचे विविध किस्से सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. ज्यामुळे सर्वसामान्यांमध्ये संभ्रमाचं वातावरण तयार होत आहे. त्यामुळे अर्थमंत्रालयाचे महसूल सचिव हसमुख अधिया यांनी काही अफवा आणि वास्तव समोर मांडलं आहे.


अफवा : प्रत्येक बिल संगणकाद्वारेच द्यावं लागणार का?

वास्तव : लेखी किंवा संगणकीकृत असे दोन्हीही बिल चालतील.

अफवा : जीएसटी लागू झाल्यानंतर व्यवसाय करताना सतत इंटरनेटची गरज?

वास्तव : प्रत्येक महिन्याला केवळ इनकम रिटर्न दाखल करतानाच इंटरनेटची गरज

अफवा : सध्या माझ्याकडे प्रोव्हिजनल ओळखपत्र आहे, पण व्यवसाय करण्यासाठी कायमस्वरुपी ओळखपत्राची प्रतीक्षा आहे?

वास्तव : प्रोव्हिजनल ओळखपत्र हेच तुमचा कायमस्वरुपाची जीएसटीआयएन क्रमांक आहे. व्यवसाय सुरु करायला काहीही हरकत नाही.

अफवा : माझ्या व्यवसायाला अगोदर सूट देण्यात आली होती, पण आता व्यवसाय सुरु करण्यापूर्वी नव्याने नोंदणी करावी लागणार?

वास्तव : तुम्ही व्यवसाय करु शकता. नोंदणी करण्यासाठी 30 दिवसांचा कालावधी देण्यात आला आहे.

अफवा : प्रत्येक महिन्याला 3 रिटर्न भरावे लागणार?

वास्तव : एकच रिटर्न आहे, ज्याचे तीन भाग आहेत. पहिला भाग डीलरला भरावा लागेल आणि उर्वरित दोन भाग संगणकीकृत आहेत, आपोआप भरले जातील.

अफवा : छोट्या डीलरलाही प्रत्येक बिलाची माहिती रिटर्नमध्ये भरावी लागणार?

वास्तव : जे डीलर थेट ग्राहकांना विक्री करतात, त्यांना एकूण विक्रीचा तपशील भरावा लागेल.

अफवा : जीएसटीचा दर जुन्या व्हॅटच्या दरांपेक्षा जास्त आहे?

वास्तव : पूर्वी एक्साईज ड्युटीसह सर्व कर अप्रत्यक्ष कर होते, जे ग्राहकांना माहिती नव्हते. आता हे सर्व कर जीएसटीमध्ये एकत्र करण्यात आल्यामुळे कर जास्त असल्याचं जाणवत आहे.