चंडीगड : कोरोना लसीच्या तिसऱ्या टप्प्याच्या चाचणीसाठी स्वयंसेवक बनलेले हरियाणाचे आरोग्य मंत्री अनिल विज कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. अनिल विज यांनी ट्वीट करुन याबाबत माहिती दिली. मला कोरोनाची लागण झाली असून उपचारांसाठी अंबाला कँटमधील सरकारी रुग्णालयात दाखल झालो आहे, असं अनिल विज यांनी सांगितलं. "माझ्या संपर्कात आलेल्यांनी स्वत: कोरोना चाचणी करावी," असं आवाहनही त्यांनी केलं आहे.





15 दिवसांपूर्वी कोरोना लसीच्या चाचणीसाठी पहिला डोस
मागील महिन्यात 20 नोव्हेंबर रोजी यांनी कोरोना लसीच्या तिसऱ्या टप्प्याच्या चाचणीसाठी पहिला डोस घेतला होता. 67 वर्षीय अनिल विज यांनी स्वत:च कोरोना लसीच्या चाचणीसाठी स्वयंसेवक बनण्याची इच्छा व्यक्त केली होती. 20 नोव्हेंबर रोजी हरियाणामध्ये कोवॅक्सिनच्या तिसऱ्या टप्प्यातील चाचणी सुरु झाली होती. यावेळी अनिल विज यांनी पहिला डोस देण्यात आला होता. विज यांच्यासोबत 200 स्वयंसेवकांना कोरोना लसीचा पहिला डोस दिला होता. यानंतर 28 दिवसांनी त्यांना कोरोना लसीचा दुसरा डोस देण्यात येणार आहे. परंतु दुसरा डोस घेण्याच्या आधीच त्यांना कोरोनाची लागण झाली आहे.


लसीचे दोन डोन आवश्यक
पण याचा अर्थ लस अपयशी ठरली आणि आता पुढे काय असं समजण्याची गरज नाही. अनिल विज यांनी लसीचा एक डोस घेतला होता. भारत बायोटेक असो वा फायझर किंवा मॉडर्ना यांनी वारंवार नमूद केलं आहे की दोन डोस प्रत्येकाला आवश्यक असणार आहेत. त्यामुळे आता भारत बायोटेकचे शास्त्रज्ञ यातून काय निष्कर्ष काढणार हे पाहणं महत्त्वाचं असेल


कोवॅक्सिन ही संपूर्ण स्वदेशी लस आहे. भारत बायोटेक कंपनी आयसीएमआरच्या साथीने कोरोनाची लस कोवॅक्सिनची निर्मिती करत आहे. ही लस 90 टक्के प्रभावी ठरेल, असा दावा कंपनीने केला आहे.


मोहनलाल खट्टर यांचं ट्वीट
दरम्यान अनिल विज यांना कोरोनाची लागण झाल्यानंतर हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांनी त्यांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी असं म्हटलं आहे. त्यांनी ट्वीट केलं आहे की, 'गृहमंत्रीजी, तुम्हाला कोरोनाची लागण झाल्याचं समजलं. इच्छाशक्तीच्या जोरावर तुम्ही या आजारावर लवकर मात कराल याबाबत मला विश्वास आहे. तुम्ही लवकरा बरे व्हाल यासाठी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो."