नवी दिल्ली: ऑनलाईन गेमिंग संदर्भात दाखवण्यात येणाऱ्या भ्रामक जाहिरातींवर माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने चिंता व्यक्त केली आहे. केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने शुक्रवारी सर्व खासगी टीव्ही वाहिन्यांना सांगितलं की, ऑनलाईन गेम खेळून पैसे वा रोजगार कमावण्याचा दावा करणाऱ्या जाहिराती दाखवण्यापासून अलिप्त राहावे. या संबंधी भारतीय जाहिरात मानक परिषद (एएससीआय) ने 24 नोव्हेंबर रोजी दिशानिर्देश जाहीर केले आहे. या  दिशानिर्देशांचं पालन सर्व खासगी वाहिन्यांनी करावं असंही माहिती आणि प्रसारण मंत्रालयानं सांगितलं आहे.


भारतीय जाहिरात मानक परिषद (एएससीआय) ने जाहीर केलेली हे  दिशानिर्देश 15 डिसेंबरपासून देशभरात लागू होणार आहेत. माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने यासंबंधी एक परिपत्रक काढून माहिती दिली आहे. त्यात म्हटलं आहे की, सर्व वाहिन्यांना निर्देश देण्यात येतात की त्यांनी एएससीआयने जाहीर केलेल्या नियमावलीचं पालन करावं. सरकारने कायद्यांद्वरे प्रतिबंध केलेल्या क्षेत्रांच्या जाहिराती कोणत्याही वाहिनीने दाखऊ नये.


ऑनलाइन गेमिंग संदर्भातील जाहिराती दाखवण्यात येत असेल तर सोबत डिस्क्लेमर देण्याचंही निर्देश मंत्रालयानं दिलं आहे. संबंधित खेळामध्ये आर्थिक जोखीम आहे आणि यात आपल्या रिस्कवर भाग घ्यावा, तसेच 18 वर्षाखालील मुलांनी या खेळात भाग घेऊ नये असे या डिस्क्लेमरमध्ये नमूद करावं असं मंत्रालयानं सांगितलं आहे.


अशा जाहिराती मोठ्या प्रमाणात सुरु
मंत्रालयानं सांगितलं आहे की, "ऑनलाईन गेमिंग, फॅन्टसी स्पोर्ट्स या संकेतस्थळांवर अशा प्रकारच्या दिशाभूल करणाऱ्या जाहिराती मोठ्या प्रमाणावर दाखवण्यात येतात असं निदर्शनास आलं आहे." यावर मंत्रालयाने चिंता व्यक्त केली आहे. माहिती आणि प्रसारण मंत्रालयानं सांगितलं की, "कोणत्याही जाहिराती या पारदर्शक असायला हव्यात. वाहिन्यांनी त्यांच्या प्रेक्षकांची सुरक्षा निश्चित करण्यासाठी अशा दिशाभूल करणाऱ्या जाहिराती दाखवणे टाळायला हवं."


भारतीय जाहिरात मानक परिषद (एएससीआय) च्या दिशानिर्देशांनुसार 18 वर्षाखालील कोणत्याही व्यक्तीला पैसे कमावण्यासाठी ऑनलाईन गेम खेळावे किंवा अशा प्रकारचे इतर गेम खेळावे अशा प्रकारच्या सूचना देणाऱ्या जाहिराती दाखवू नयेत.


महत्वाच्या बातम्या: