अहमदाबाद : पाटीदार समाजाचे नेते आणि गुजरात काँग्रेसचे नेते हार्दिक पटेल गेल्या 20 दिवसांपासून बेपत्ता असल्याचं त्यांच्या पत्नी किंजल पटेल यांनी सांगितलं आहे. तसेच गुजरात सरकार हार्दिक पटेल यांना टार्गेट करत असल्याचा आरोपही किंजल यांनी केला आहे. हार्दिक पटेल यांच्यावर 2015 च्या पाटीदार आरक्षण आंदोलनासंबंधित देशद्रोहाचा खटला सुरु आहे. याप्रकरणी त्यांना 18 जानेवारीला अटकही झाली होती. मात्र अटकेनंतर हार्दिकची कोणतीही माहिती नसल्याचा दावा किंजल यांनी केला असून पोलीसही याबाबत काही माहिती देत नसल्याचं त्यांनी सांगितलं.


पाटीदार आरक्षण नेत्यांच्या वतीने आजोजित केलेल्या कार्यक्रमात किंजल यांनी म्हटलं की, "हार्दिक पटेल यांना 18 जानेवारीला अटक करण्यात आली होती. त्यानंतर त्यांची काहीही माहिती नाही. ते सध्या कुठे आहेत याची आम्हाला माहिती नाही. मात्र पोलीस वारंवार येऊन आम्हाला त्यांचा पत्ता विचारत आहे. हार्दिक पटेल यांना टार्गेट केलं जात आहे. भाजपमध्ये गेलेल्या इतर पाटीदार नेत्यांवर अशी कारवाई होत नाही. हार्दिक पटेल यांनी लोकांना भेटावं अशी गुजरात सरकारची इच्छा नाही."


हार्दिक पटेल यांना सुनावणीसाठी वारंवार हजर राहण्याचे आदेश न्यायालायने दिले होते. मात्र कधीही हजर न राहिल्याने त्यांना 18 जानेवारीला अटक करण्यात आली होती. याप्रकरणी हार्दिक पटेल यांची चार दिवसांनंतर जामिनावर सुटका करण्यात आली होती. मात्र पाटन आणि गांधीनगर येथील दोन प्रकरणात त्यांना पुन्हा ताब्यात घेण्यात आलं होतं. या दोन्ही प्रकरणात 24 जानेवारीला त्यांना जामीन मिळाला होता. न्यायालयाने पुन्हा त्यांना सुनावणीसाठी हजर राहण्याचे आदेश दिले होते. मात्र न्यायालयात हजर न झाल्याने त्यांच्याविरोधात पुन्हा अटक वॉरंट जारी करण्यात आलं.


हार्दिक पटेल बेपत्ता असले तरी सोशल मीडियावर अॅक्टिव्ह आहेत. आपच्या दिल्लीतील विजयानंतर त्यांनी अरविंद केजरीवाल यांचं ट्विटरवर अभिनंदन केलं. तर 11 फेब्रुवारीला केलेल्या दुसऱ्या ट्वीटमध्ये म्हटलं की, चार वर्षांपूर्वी गुजरात पोलिसांनी माझ्याविरोधात खोटा खटला दाखल केला होता. लोकसभा निवडणुकीच्या वेळी अहमदाबादच्या पोलीस आयुक्तांनी माझ्या विरोधात दाखल झालेल्या खटल्यांची यादी मागितली होती, मात्र हे प्रकरण त्या प्रकरणांच्या यादीमध्ये नव्हतं. पंधरा दिवसांपूर्वी अचानक पोलीस मला ताब्यात घेण्यासाठी घरी आले, मात्र मी घरी नव्हतो. माझ्यावर खोटे आरोप करण्यात आले आहेत. जामिनाची प्रक्रिया उच्च न्यायालयात सुरु आहे. गुजरातमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आहेत, त्यामुळे मला जेलमध्ये बंद करण्याचं षडयंत्र आहे. मी भाजपविरोधातील लढाई लढत राहीन, लवकरच भेटू. जय हिंद.





कोण आहेत हार्दिक पटेल?


हार्दिक पटेल यांचा जन्म 20 जुलै 1993 मध्ये गुजरातमधील चंदननगरी येथे झाला. गुजरातमधील पाटीदार आंदोलनाचे ते मोठे नेते आहेत. गुजरात विधानसभेच्या आधी त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. पाटीदार समाजाला ओबीसीअंतर्गत सरकारी नोकरी आणि शिक्षणात आरक्षणाची त्यांनी मागणी केली. हार्दिक पटेल 2011 मध्ये सरदार पटेल समुहाशी जोडले गेले होते. त्यानंतर 2015 मध्ये त्यांनी पाटीदार अनामद आंदोलन समितीची स्थापना केली.


संबंधित बातम्या