सुरेंद्रनगर : गुजरातच्या सुरेंद्रनगरमध्ये काँग्रेस नेता हार्दिक पटेल यांना एका व्यक्तीने कानाखाली लगावली. एका प्रचारसभेत हार्दिक पटेल भाषण करत असतानाच, एका व्यक्तीने त्यांना थोबाडीत मारलं. यानंतर तिथल्या लोकांनी हल्लेखोराला ताब्यात घेऊन त्याला बेदम चोप दिला. त्याला दुखापत झाली असून सध्या त्याच्यावर उपचार सुरु आहेत.


तरुण गुर्जर असं हल्लेखोराचं नाव आहे. पोलिसांच्या चौकशीत तरुण गज्जरने हार्दिक पटेल यांच्यावरील हल्ल्याचं कारण सांगितलं. हार्दिक पटेल यांच्या आंदोलनामुळे माझ्या कुटुंबाला अनेक अडचणींना सामोरं जावं लागलं होतं. त्यामुळे मी त्यांना थोबाडीत मारली. मागील तीन वर्षांपासून हार्दिक पटेल माझ्या निशाण्यावर होते. मी शहीद होण्यासाठी तयार आहे.



तरुण गुर्जर म्हणाला की, "पहिल्यांदा पाटीदार आंदोलन झालं होतं, त्यावेळी माझी पत्नी गर्भवती होती. तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरु होते. त्याच्या आंदोलनामुळे आम्हाला अनेक अडचणींचा सामना करावा लागला होता, मी तेव्हाच ठरवलं होतं की या व्यक्तीला मी मारणार. मला कोणत्याही परिस्थितीत त्याला धडा शिकवायचा होता. तर अहमदाबाद आंदोलनानंतर जेव्हा मी माझ्या मुलासाठी औषध आणायला गेलो होतो, पण सगळं बंद झालं होतं. त्याचा मनात येईल तेव्हा रस्ते बंद करतो, गुजरात बंद करतो. तो कोण आहे? तो काय गुजरातचा हिटलर आहे का?"


काय आहे प्रकरण?
गुजरातच्या सुरेंद्रनगरमधील बलदाणा या गावात प्रचारसभेत एका व्यक्तीने हार्दिक पटेल यांना कानाखाली लगावली. या प्रचारसभेला हार्दिक पटेल संबोधित करत असताना एक व्यक्ती मंचावर पोहोचला आणि काही कळायच्या आत हार्दिक पटेलांच्या कानाखाली लगावली. यावेळी उपस्थित कार्यकर्त्यांनी त्या व्यक्तीला पकडलं आणि मंचावरच बेदम मारहाण केली. नंतर त्याला पोलिसांच्या ताब्यात दिलं.

हार्दिक पटेल यांच्या निवडणूक लढवण्यावर बंदी
राहुल गांधी यांच्या उपस्थितीत हार्दिक पटेल 12 मार्च रोजी काँग्रेसमध्ये सामील झाले होते. ते निवडणूक लढवणार होते. पण 2015 मध्ये मेहसाणामध्ये दंगल घडवल्याप्रकरणी जुलै 2018 मध्ये सत्र न्यायालयाने हार्दिक पटेल यांना दोन वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावली होती. लोकप्रतिनिधी कायदा 1951 अंतर्गत दोषी सिद्ध झाले होते. सध्या ते जामीनावर बाहेर आहेत. या प्रकरणात झालेली शिक्षा रद्द करावी, अशी मागणी करणारी हार्दिक पटेल यांची याचिका गुजरात उच्च न्यायालयाने फेटाळली होती. त्यामुळे हार्दिक पटेल यंदा लोकसभा निवडणूक लढवू शकत नाहीत.