गांधीनगर : काँग्रेस नेते हार्दिक पटेल यांचे भाषण सुरु असताना एका व्यक्तीने कानशिलात लगावली. सुरेंद्रनगरच्या वाढवालमधील बालदना या गावात प्रचारसभेत एका व्यक्तीने हार्दिक यांना कानाखाली लगावली. या प्रचारसभेला हार्दिक पटेल संबोधित करत असताना एक व्यक्ती मंचावर पोहोचला आणि काही कळायच्या आत हार्दिक पटेलांच्या कानाखाली लगावली. यावेळी उपस्थित कार्यकर्त्यांनी त्या व्यक्तीला पकडले आणि मंचावरच बेदम मारहाण केली. हार्दिक पटेलांना कानशिलात का आणि कुणी लगावली हे मात्र अद्याप गुलदस्त्यात आहे.  हार्दिक पटेल हे गुजरातमधील पाटीदार आंदोलनातील युवा नेते आहेत. कालच नवी दिल्लीतील भाजप कार्यालयात एका भाजपच्या ज्येष्ठ नेत्याला बूट फेकून मारल्याने खळबळ उडाली होती.