Hardik Patel To Join BJP : पाटीदार समाजाचा चेहरा म्हणून ओळखले जाणारे हार्दिक पटेल (Hardik Patel) यांची सध्या गुजरातच्या (Gujrat) राजकारणात जोरदार चर्चा आहे. गुजरातमधील पाटीदार आंदोलनात सामील होण्यापासून ते काँग्रेसमध्ये प्रवेश करण्यापासून प्रदेशाध्यक्ष होण्यापर्यंत आणि काँग्रेसला रामराम केल्यानंतर आता पुढे ते काय भूमिका घेणार? इथपर्यंत ते सतत चर्चेत आहेत. हार्दिक यांनी काँग्रेसला रामराम केल्यापासूनच त्यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चांनी जोर धरला होता. आता या चर्चांना पूर्णविराम लागला असून हार्दिक पटेल आपल्या 15 हजार कार्यकर्त्यांसह आज दुपारी 12 वाजता भाजपमध्ये (BJP) प्रवेश करणार आहेत.


पाटीदार नेता हार्दिक पटेल यांनी स्वतः भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचं जाहीर करत एक पोस्टर जारी केलं आहे. त्यानुसार हार्दिक पटेल गुरुवारी, 2 जून रोजी पटेल कमलम गांधीनगरमध्ये भाजपात प्रवेश करणार असल्याचं सांगण्यात आलं. पोस्टरमध्ये म्हटलं आहे की, हार्दिकचा भाजपमध्ये प्रवेश करण्याचा कार्यक्रम आज सकाळी 9 वाजल्यापासून सुरू होणार आहे. सकाळी 9 वाजता ते घरी दुर्गा पठण करतील, त्यानंतर ते सकाळी 10 वाजता SGVP गुरुकुल येथे श्याम आणि धनश्याम यांची आरती करतील.


18 मे रोजी सोडली होती काँग्रेसची साथ 


हार्दिक पटेल यांच्या जारी करण्यात आलेल्या पोस्टरनुसार, भाजप प्रवेशापूर्वी ते साधु-संतांसह गोपूजेत सहभागी होती. त्यानंतर ते 11 वाजता कमलम् गांधीनगरमध्ये भाजपचे प्रदेशाध्यक्षांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश करतील. दरम्यान, गेल्या अनेक दिवसांच्या नाराजीनंतर हार्दिक पटेल यांनी 18 मे रोजी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांना पत्र लिहत पक्षाला रामराम केला होता. 


काँग्रेस नेतृत्त्वामुळे हार्दिक यांची नाराजी


दरम्यान, पंतप्रधान मोदी यांच्यासाठी यमापासून खोटारडा शब्द वापरल्यानं चर्चेत आलेले हार्दिक पटेल आता स्वतः भाजपची कास धरणार आहेत. 2019 मध्ये हार्दिक यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. काँग्रेसनं 11 जुलै 2020 रोजी हार्दिक यांची गुजरात प्रदेशाध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. काँग्रेस नेतृत्वाकडून खूप त्रास दिला जात असल्यामुळे त्यांनी पक्षातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतल्याचं हार्दिक पटेल यांनी सांगितलं.