मुंबई: भारतीय स्वातंत्र्यदिनाचा उत्साह आता अवघ्या काही दिवसांवर येऊन पोहोचला असून देशभर त्याची धूम पाहायला मिळतेय. देशातल्या प्रत्येक घरावर यंदा तिरंगा फडकवण्याचं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं असून त्या दृष्टीने प्रयत्न सुरू आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह सर्वच प्रमुख नेत्यांनी त्यांच्या सोशल मीडियावरील डीपी बदलला आहे. अशात जर तुम्ही आपल्या घरावर तिरंगा फडकवण्यासाठी खरेदी करणार असाल तर तो घर बसल्या खरेदी करु शकता, तेही अगदी स्वस्तात. पोस्ट ऑफिसने ही सुविधा उपलब्ध करुन दिली आहे, 


पोस्ट ऑफिसमधून असा खरेदी करा तिरंगा
पोस्ट ऑफिसच्या अधिकृत वेबसाईटवर  www.epostoffice.gov.in भेट देऊन तुम्ही घरबसल्या तिरंगा खरेदी करु शकता. या वेबसाईटला भेट दिल्यानंतर होम पेजवर तिरंगा दिसेल. त्यावर तुम्हाला क्लिक करावं लागेल. या ठिकाणी लॉग ईन केल्यानंतर तुम्हाला तुमचे नाव, पत्ता आणि मोबाईल नंबर तसेच किती संख्येने तिरंगा पाहिजेत याची नोंद करावी लागणार आहे. त्यानंतर ऑर्डर कन्फर्म करण्यासाठी तुम्हाला पेमेंट प्रोसेस पूर्ण करावं लागेल. तुम्ही जर एकदा ऑर्डर केली तर तुम्हाला ती रद्द करता येणार नाही. पोस्टातून तिरंगा खरेदी करण्यासाठी तुम्हाला 25 रुपये खर्च करावे लागतील. पोस्ट ऑफिसने 1 ऑगस्टपासून तिरंगा विक्रीला सुरुवात केली आहे. 


केंद्र सरकारने यंदा हर घर तिरंगा हा उपक्रम जाहीर केला आहे. त्याला लोकांमधून चांगला प्रतिसादही मिळत असल्याचं दिसून येतंय. पण राष्ट्रीय ध्वज फडकवण्यासाठी काही नियमावली आहे. .यामध्ये अलिकडेच काही बदल करण्यात आले आहेत. जसं की सुर्योदयाच्या पहिला आणि सूर्यास्ताच्या नंतर आपण राष्ट्रीय ध्वज फडकावता येणार नाही असा नियम होता. आता त्यात बदल करण्यात आला असून रात्रीही तिरंगा फडकवण्याची परवानगी देण्यात आली आहे. 


13  ते 15 ऑगस्ट या कालावधीत आपल्या घरावर तिरंगा फडकवा 
यावर्षी आपण सर्वत्र स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत आहे, त्यासाठी 'हर घर तिरंगा' मोहिमेला पाठबळ देऊया असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. 13  ते 15 ऑगस्ट या कालावधीत आपल्या घरावर तिरंगा फडकवा किंवा तुमच्या घरांमध्ये तिरंगा लावा. या मोहिमेमुळे आपले राष्ट्रीय ध्वजाशी असलेले ऋणानुबंध अधिक दृढ होतील असेही मोदी म्हणाले.