ICMR Cyber Attack : एम्स (AIIMS) हॉस्पिटलच्या वेबसाईटवर सायबर हल्ला झाल्यानंतर आता भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद म्हणजे आयसीएमआर (ICMR) या भारत सरकारच्या आरोग्य संशोधन संस्थेच्या वेबसाइटला हॅकर्सने लक्ष्य केलं आहे. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, हॅकर्स आयसीएमआरच्या वेबसाईटवर सायबर हल्ला करण्याचा सतत प्रयत्न करत आहेत. आयसीएमआरच्या टीमने वेळीच सावध होऊन हॅकर्सना प्रतिबंध केला. हॅकर्स सतत आयसीएमआरच्या वेबसाईटमध्ये घुसण्याचा प्रयत्न करत आहेत. राष्ट्रीय विज्ञान केंद्र (NIC) च्या अधिकाऱ्यानं दिलेल्या माहितीनुसार, 30 नोव्हेंबर रोजी 24 तासांत आयसीएमआरच्या वेबसाईटवर 6000 हून अधिक वेळा सायबर हल्ला करण्याचा प्रयत्न करण्यात आला. पण हॅकर्सचा हल्ला अयशस्वी ठरला.
IMCR ची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न
एका सरकारी अधिकाऱ्याने सांगितलं की, हाँगकाँग स्थि आयपी अॅड्रेसवरून हॅकर्सनी 30 नोव्हेंबर रोजी 24 तासांत सुमारे 6000 वेळा IMCR ची वेबसाइट हॅक करत त्यामध्ये घुसण्याचा प्रयत्न केला. ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेसच्या (AIIMS) वेबसाईटवर सायबर हल्ला झाल्यानंतर आता आयसीएमआरला लक्ष्य करण्यात आलं आहे.
सायबर हल्ल्याचा कट उधळला
अधिकाऱ्याने माहिती देत सांगितलं की, 'ICMR च्या वेबसाइटवर उपलब्ध डेटा सुरक्षित आहे. वेबसाइटची सुरक्षा ही राष्ट्रीय विज्ञान केंद्र (NIC) डेटा सेंटरची जबाबदारी आहे. एनआयसीने हॅकर्सचा कट उधळवत सायबर हल्ला यशस्वीपणे हाणून पाडला आहे.
पाहा स्पेशल रिपोर्ट : AIIMS Cyber Attack, सर्व्हर पूर्ववत; वैद्यकीय क्षेत्रातील मोठी हॅकिंग कशी झाली?
एम्स सर्व्हर हॅक
अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था (एम्स) 24 नोव्हेंबरला इथलं सर्व्हर डाऊन झालं. त्यानंतर रुग्णालयाच्या डेटाबेसवर सायबर अटॅक झाल्याची माहिती समोर आली. आता हॅकर्सनी ‘एम्स’कडे तब्बल 200 कोटींहून अधिक खंडणीची मागणी केली होती. हॅकर्सने दावा केला होता की, चोरलेल्या डेटाबेसमध्ये मंत्र्यांसह महत्त्वाच्या व्यक्तींची माहिती आहे. या सायबर हल्ल्यामुळे सायबर सुरक्षा यंत्रणेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झालं आहे. या प्रकरणाचा तपास सध्या सुरु आहे.
आरोग्य विभागांच्या वेबसाईटवरील हल्ल्यामध्ये वाढ
सरकारी अधिकाऱ्यांनी सर्व सरकारी संस्थांना त्यांची ऑपरोटिंग सिस्टिम अपडेट करण्यास सांगितली आहे. हॅकर्स सायबर हल्ल्यासाठी संधी शोधत आहेत. अधिकाऱ्यांनी सांगितलं की, आरोग्य संस्थांच्या वेबसाईटवर असणारी रुग्णांची माहिती हॅकर्सच्या निशाण्यावर आहे. आरोग्य विभागांच्या वेबसाईटवरील हल्ल्यामध्ये 2020 पासून वाढ झाली आहे.