Gyanvapi Masjid : उत्तर प्रदेशमधील वाराणसी येथील ज्ञानवापी मशीद परिसराचे सर्वेक्षण-व्हिडीओग्राफीचे काम सोमवारी पूर्ण झाले आहे. ज्ञानवापी परिसराच्या सर्वेक्षणाविरोधातील याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात मंगळवारी सुनावणी होणार आहे. न्यायमूर्ती डीवाय चंद्रचूड आणि न्यायमूर्ती पीएस नरसिंहा यांच्या खंडपीठासमोर या प्रकरणाची सुनावणी होणार आहे. ज्ञानवापी मशिदीच्या आवारात नंदीच्या पुतळ्यासमोर वाझू खानाजवळ एक शिवलिंग सापडल्याचा दावा सर्वेक्षण पथकाने केला आहे. ज्या ठिकाणी शिवलिंग सापडल्याचा दावा केला जात आहे, त्या ठिकाणी लोकांच्या प्रवेशावर बंदी घालावी आणि मशिदीमध्ये फक्त 20 मुस्लिमांना नमाज अदा करण्याची परवानगी द्यावी, असे निर्देश न्यायालयाने जिल्हा दंडाधिकार्‍यांना दिले आहेत.


उत्तर प्रदेशातील वाराणसी जिल्ह्यातील एका न्यायालयाने सोमवारी जिल्हा प्रशासनाला ज्ञानवापी मशीद संकुलाचा भाग सील करण्याचे निर्देश दिले जेथे शिवलिंग सापडल्याचा दावा केला जात आहे. न्यायालयाने सील करण्यात येणार्‍या जागेचे रक्षण आणि सुरक्षेची जबाबदारी वाराणसी पोलीस आयुक्तालय आणि सीआरपीएफच्या कमांडंटवर सोपवली आहे.
 
सोमवारी तिसऱ्या दिवशी कडेकोट बंदोबस्तात ज्ञानवापी मशीद परिसराचे सर्वेक्षण-व्हिडीओग्राफीचे काम पूर्ण झाले आहे. ज्ञानवापी-श्रृंगार गौरी संकुलाच्या सर्वेक्षण-व्हिडीओग्राफीच्या कामासाठी नियुक्त केलेले वकील आयुक्त (न्यायालय आयुक्त) अजय मिश्रा यांना पक्षपाताच्या आरोपाखाली काढून टाकण्याची मागणी करणारी याचिका वाराणसीच्या न्यायालयाने गुरुवारी फेटाळली. ज्ञानवापी मशिदीच्या आतही व्हिडीओग्राफी केली जाईल, असे न्यायालयाने स्पष्ट केले होते. त्यानुसार आज सर्वेक्षणाचे काम पूर्ण करण्यात आले. 


जिल्हा न्यायालयाने असे म्हटले होते की, सर्वेक्षणाच्या उद्देशाने ज्ञानवापी मशीद परिसराच्या काही भागांमध्ये प्रवेश करण्यासाठी चाव्या उपलब्ध नसल्यास कुलूप तोडले जाऊ शकतात. सर्वेक्षणाच्या कामात अडथळे निर्माण करणाऱ्यांवर एफआयआर नोंदवण्याचे निर्देशही न्यायालयाने अधिकाऱ्यांना दिले होते. 17 मे पर्यंत संपूर्ण परिसराचे व्हिडीओग्राफी करून अहवाल सादर करण्याचे निर्देशही न्यायालयाने दिले होते.


जिल्हा दंडाधिकारी कौशल राज शर्मा यांनी दिलेल्या माहितीनुसार, न्यायालयाने स्थापन केलेल्या आयोगाच्या कामकाजादरम्यान काशी विश्वनाथ मंदिराचे चार नंबरचे गेट भाविकांसाठी बंद करण्यात आले होते. कारण त्या गेटचा वापर कोर्ट कमिशनच्या सदस्यांच्या येण्या-जाण्यासाठी होत आहे. 


दरम्यान, ज्ञानवापी मशिदीच्या परिसरातील सर्वेक्षणाविरोधातील याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात मंगळवारी सुनावणी होणार आहे. न्यायमूर्ती डीवाय चंद्रचूड आणि न्यायमूर्ती पीएस नरसिंहा यांच्या खंडपीठासमोर या प्रकरणाची सुनावणी होणार आहे. वाराणसीच्या अंजुमन इनानिया मशिदीच्या व्यवस्थापन समितीच्या वतीने ही याचिका दाखल करण्यात आली आहे.  


ज्ञानवापी मशीद काशी विश्वनाथ मंदिराजवळ आहे. पाच महिला याचिकाकर्त्यांनी न्यायालयाकडे बाहेरील भिंतींवरील मूर्तींसमोर तसेच जुन्या मंदिराच्या परिसरात दिसणार्‍या आणि अदृश्य असलेल्या इतर देवतांची पूजा करण्याची परवानगी मागितली होती.