Gyanvapi Controversy: ज्ञानवापी मशीद-श्रृंगार गौरी प्रकरणी वाराणसी न्यायालयाचा निकाल आज येणार आहे. ज्ञानवापी प्रांगणात असलेल्या देवी शृंगार गौरीच्या नियमित दर्शन तसेच पूजेबाबत जिल्हा न्यायालय आज निर्णय देणार आहे. मात्र जिल्हा न्यायालयाच्या आदेशापूर्वी, वाराणसीमध्ये प्रतिबंधात्मक आदेश (कलम 144) लागू करण्यात आले आणि सुरक्षा कडक करण्यात आली. जिल्हा न्यायाधीश ए.के.विश्वेश यांनी गेल्या महिन्यात या जातीयदृष्ट्या संवेदनशील खटल्याचा निकाल 12 सप्टेंबरपर्यंत राखून ठेवला होता. अलाहाबाद हायकोर्टात आज वाराणसीतील ज्ञानवापी प्रकरणी सुनावणी होणार आहे.
सुनावणी अंतिम टप्प्यात
1991 मध्ये 31 वर्षांपूर्वी वाराणसीच्या जिल्हा न्यायालयात दाखल झालेल्या खटल्याची सुनावणी करता येईल की नाही हे उच्च न्यायालयाने ठरवायचे आहे. तसेच एएसआयकडून करण्यात येत असलेल्या सर्वेक्षणासह महत्वाच्या मुद्द्यांवर उच्च न्यायालयाने आज निर्णय द्यायचा आहे. न्यायमूर्ती प्रकाश पडिया यांच्या एकल खंडपीठात दुपारी 2 पासून सुनावणी होणार आहे. या प्रकरणाची सुनावणी आता अंतिम टप्प्यात आली आहे.
ज्ञानवापी प्रकरण देशभर चर्चेचा विषय
उत्तर प्रदेशचे पोलिस आयुक्त ए सतीश गणेश यांनी रविवारी सांगितले की, वाराणसी आयुक्तालयात प्रतिबंधात्मक आदेश जारी करण्यात आले आहेत. शांतता राखण्यासाठी अधिकार्यांना आपापल्या भागातील धार्मिक नेत्यांशी चर्चा करण्यास सांगितले आहे. ज्ञानवापी शृंगार गौरी खटला चालवण्या योग्य आहे की नाही? यावर न्यायालय आपला निकाल देईल. हे प्रकरण देशभर चर्चेचा विषय बनले आहे.
कडक पोलीस व्यवस्था तैनात
पोलीस आयुक्त म्हणाले की, कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी संपूर्ण शहराला सेक्टरमध्ये विभागण्यात आले असून, आवश्यकतेनुसार पोलीस बळ देण्यात आले आहे. संवेदनशील भागात फ्लॅग मार्च आणि पायी मार्च करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. जिल्ह्यातील सीमावर्ती भागातील हॉटेल, गेस्ट हाऊसमध्ये चेकिंग तीव्र करण्यात आली असून, सोशल मीडियावरही लक्ष ठेवण्यात येत आहे
पाच महिलांनी दाखल केली होती याचिका
ज्ञानवापी मशिदीच्या बाहेरील भिंतीवर ज्या हिंदू देवतांच्या मूर्ती आहेत त्यांच्या दैनंदिन पूजेची परवानगी मागणारी याचिका या पाच महिलांनी दाखल केली होती. अंजुमन इंतेजामिया मस्जिद समितीने ज्ञानवापी मशीद ही वक्फ मालमत्ता असल्याचे म्हटले आहे. तसेच याचिकेच्या सुनावणीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. हिंदू पक्षाचे वकील मदन मोहन यादव म्हणाले होते की, मंदिर पाडून मशीद बांधण्यात आली होती. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर जिल्हा न्यायालयात या प्रकरणाची सुनावणी सुरू आहे. याआधी ट्रायल कोर्टाने जागेचे व्हिडिओग्राफी सर्वेक्षण करण्याचे आदेश दिले होते.
शिवलिंग सापडल्याचा दावा
16 मे रोजी सर्वेक्षणाचे काम पूर्ण झाले आणि 19 मे रोजी न्यायालयात अहवाल सादर करण्यात आला. ज्ञानवापी मशीद-श्रृंगार गौरी संकुलाच्या व्हिडिओग्राफी सर्वेक्षणादरम्यान शिवलिंग सापडल्याचा दावा हिंदू बाजूने ट्रायल कोर्टात केला होता, परंतु मुस्लिम बाजूने त्याला विरोध केला.