अहमदाबाद : गुजरातमधील भाजप आमदाराने राष्ट्रवादीच्या महिला पदाधिकाऱ्याला बेदम मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. राष्ट्रवादीची ही महिला पदाधिकारी पाणी मिळत नसल्याची तक्रार घेऊन भाजप आमदार बलराम थावाणी यांच्याकडे गेली होती, त्यावेळी हा प्रकार घडला. बलराम थावाणी गुजरातच्या नरोडा मतदारसंघातून आमदार आहेत.
मारहाणीच्या संपूर्ण घटनेचा व्हिडीओ आता समोर आला आहे. एका स्थानिक व्यक्तीनं आपल्या मोबाईल कॅमेऱ्यात हा सगळा प्रकार कैद केला. पोलिसांनीही या घटनेची तक्रार नोंदवण्यास आधी टाळाटाळ केली. पण अखेर माध्यमांकडे ही बातमी गेल्यावर पोलिसांनी तक्रार नोंदवून घेतली.
राष्ट्रवादी महिला पदाधिकारी नीतू तेजवाणी पाण्यासंबंधीची तक्रार घेऊन बलराम थावाणी यांच्याकडे गेल्या होत्या. नीतू यांची तक्रार ऐकल्यानंतर थावाणी यांचा रागाचा पारा चढला आणि त्यांनी थेट नीतू यांना मारहाण करण्यास सुरुवात केली.
आमदार बलराम थावाणी महिलेला मारहाण करत असल्याचं पाहून तेथे उपस्थित असलेल्या त्यांच्या समर्थकांनीही नीतू यांना मारहाण केली. मारहाणीदरम्यान नीतू या मदतीसाठी ओरडत होत्या. मात्र भीतीपोटी कुणीही त्यांच्या मदतीला पुढे आले नाही.
आमदार बलराम थावाणी यांनी केवळ मलाच मारहाण केली नाही, तर माझ्या बचावासाठी आलेल्या माझ्या पतीलाही मारहाण केली. मारहाण करणाऱ्यांमध्ये थावणी यांच्यासोबत त्यांच्या कार्यकर्त्यांचाही समावेश आहे, असं नीतू तेजवाणी यांनी सांगितलं.
मारहाणीची तक्रार करण्यासाठी नीतू यांनी पोलीस स्टेशन गाठलं. मात्र पोलिसांनीही तक्रार दाखल करुन घेण्यास टाळाटाळ केली. घटनेचा व्हिडीओ समोर आल्यानंतर पोलिसांना याबाबत तक्रार दाखल करुन घेतली. मात्र याप्रकरणी अद्याप कोणावरही कारवाई किंवा अटक झालेली नाही.
घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर आमदार जिग्नेश मेवाणी यांनी थावाणी यांच्या अटकेची मागणी केली आहे. जिग्नेश मेवाणी यांनी ट्वीटमध्ये गुजरात डीजीपी आणि अहमदाबाद पोलिसांना टॅग करत म्हटलं की, "अहमदाबादच्या नरोडा येथे पाणीटंचाईची समस्या आहे. याची तक्रार करण्यासाठी गेलेल्या महिलेला भाजपच्या माननीय आमदार बलराम थावाणी यांनी मारहाण केली. त्यांना तातडीने अटक करा. असं चालणार नाही."