लखनौ : उत्तर प्रदेशमधील उन्नाव मतदारसंघाचे भाजप खासदार साक्षी महाराज यांनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्याविरोधात वादग्रस्त विधान केले आहे. साक्षी महाराज म्हणाले की, हिरण्यकश्यप नावाचा एक राक्षस होता, त्याचा मुलगा प्रल्हाद 'जय श्री राम' म्हणायचा, म्हणून हिरण्यकश्यपने त्याला तुरुंगात डांबले. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या हिरण्यकश्यप राक्षसाच्या वंशज आहेत, त्यामुळे त्यासुद्धा जय श्रीराम बोलणाऱ्यांना तुरुंगात डांबत आहेत.


परंतु या विधानानंतर साक्षी महाराज मोठ्या प्रमाणात ट्रोल होत आहेत. सोशल मीडियावर नेटीझन्सनी साक्षी महाराजांची अक्कल काढली आहे. नेटीझन्स एवढ्यावरच थांबले नाहीत. नेटीझन्स आता साक्षी महाराजांना पुराण-विद्या शिकवू लागले आहेत.

नेटीझन्सचे म्हणणे आहे की, हिरण्यकश्यप हा राक्षस सतयुगात होऊन गेला. या युगात भगवान विष्णूंनी त्यांचा तिसरा अवतार (नरसिंह अवतार) घेतला होता. त्रेतायुगात नरसिंहाचा अवतार घेऊन विष्णूंनी हिरण्यकश्यप राक्षसाला मारले होते. श्रीराम हा भगवान विष्णूंचा सातवा अवतार आहे.

नरसिंह आणि राम हे दोन वेगवेगळ्या युगातील वेगवेगळे अवतार आहेत. तर मग सतयुगात भक्त प्रल्हात रामाचे नाव कसे काय घेईल? असा प्रश्न सर्वांनाच पडला आहे. भक्त प्रल्हाद हा श्री नारायणाचे नाव घेत होता. त्यामुळे हिरण्यकश्यप राक्षसाने त्याला तुरुंगात डांबले होते. परंतु साक्षी महाराजांच्या दाव्यानुसार भक्त प्रल्हाद रामाचे नाव घेत होता, त्यामुळे त्याला तुरुंगात डांबून ठेवण्यात आले होते.

साक्षी महाराज म्हणाले आहेत की,हिरण्यकश्यप नावाचा एक राक्षस होता, त्याचा मुलगा प्रल्हाद 'जय श्री राम' म्हणायचा, परंतु हिरण्यकश्यपने त्याला तुरुंगात डांबले. आता बंगालमध्ये अशी स्थिती निर्माण झाली आहे की, 'जय श्रीराम' म्हणाल्यानंतर ममता बॅनर्जी चिडू लागल्या आहेत. त्या शिव्या देऊ लागल्या आहेत. रस्त्यावर उतरु लागल्या आहेत. विरोधात जाऊन विविध योजना बनवू लागल्या आहेत.


जय श्रीराम या घोषणेवरुन पश्चिम बंगालमध्ये राजकारण केले जाऊ लागले आहे. याबाबत ममता बॅनर्जी यांनी फेसबुक पोस्ट लिहून स्वतःची बाजू मांडली आहे. पोस्टमध्ये बॅनर्जी यांनी म्हटले आहे की, भाजपवाल्यांनी जय श्रीराम या घोषणेला विकृत रुप देत त्यांच्या पक्षाची घोषणा बनवले आहे. याद्वारे भाजपवाले धर्म आणि राजकारण एकत्र मिसळण्याचा प्रयत्न करत आहेत. मला कोणत्याही पक्षाची सभा, रॅली किंवा त्यांच्या घोषणेची अडचण नाही.


पश्चिम बंगालमध्ये भाजप आणि तृणमूल काँग्रेसमधील वाद विकोपाला जाऊ लागला आहे. साक्षी महाराजांनी वादग्रस्त विधान करुन त्यामध्ये अधिक भर टाकली आहे.

 भाजप कार्यकर्ते ममता बॅनर्जींना 'जय श्रीराम' लिहिलेले 10 लाख पोस्टकार्ड पाठवणार | स्पेशल रिपोर्ट | एबीपी माझा