सुरत : गुजरातच्या सरथाणा परिसरातील तक्षशिला कॉम्प्लेक्सला लागलेल्या आगीत 20 जणांचा मृत्यू झाला आहे. याठिकाणी एक कोचिंग क्लास चालवलं जात होतं. या क्लासमधील एका शिक्षकाचाही मृतांमध्ये समावेश आहे. तक्षशिला कॉम्प्लेक्सच्या एका मजल्यावर क्लास सुरु असताना अचानक आग लागल्याने मुलांनी आणि तेथील उपस्थितांनी इमारतीवरुन उड्या मारल्या.





आगीची घटना घडली त्यावेळी क्लासमध्ये एकूण 50 मुले उपस्थित होते. घटनेनंतर अनेक जण जखमी झाले असून त्यांना जवळच्याच रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. फायर ब्रिगेडच्या 15 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. आग नेमकी कशामुळे लागली याचं कारण अद्याप समोर आलेलं नाही.



तक्षशिला कॉम्प्लेक्सच्या समोरील बाजूला पहिल्यांदा आग लागण्यास सुरुवात झाली होती. आगीनंतर इमारतीत सगळीकडे गोंधळ उडाला. दुसऱ्या मजल्यावर मुले कोचिंग क्लासमध्ये बसले होते. मात्र आगीपासून जीव वाचवण्यासाठी अनेकांनी चौथ्या मजल्यावर धाव घेतली. मात्र तेथेही आग पोहोचल्याने अनेकांनी चौथ्या मजल्यावरुन खाली उड्या मारल्या.





पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही या घटनेबद्दल दु:ख व्यक्त केलं आहे. "सूरतमधील घटनेनंतर मी दु:खी असून माझ्या संवेदना मृतांच्या कुटुंबियासोबत आहेत. घटनेत जखमी झालेले लवकर ठीक होवोत, यासाठी अशी मी प्रार्थना करतो. गुजरात सरकार आणि स्थानिक प्रशासनाने पीडितांना तातडीने मदत पुरवावी अशा सूचना दिल्या आहेत", असं ट्वीट नरेंद्र मोदींनी केलं आहे.