नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला दारुण पराभव स्वीकारावा लागला आहे. निवडणुकीत काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी तर अपयशी ठरलेच, मात्र मोठ्या जोमात सक्रीय राजकारणात उतरलेल्या प्रियंका गांधी यांच्यामध्ये काँग्रेसला एक आशा दिसत होती. मात्र यांची जादूही चालली नाही.


अमेठीमध्ये राहुल गांधी यांचा जो लाजिरवाणा पराभव झाला, त्या अमेठी मतदारसंघाची जबाबदारी प्रियंका यांच्यावर होती. विशेष म्हणजे ज्या पूर्व उत्तर प्रदेशची जबाबदारी प्रियंका गांधी यांच्यावर सोपवण्यात आली होती, त्याच भागात हा मतदारसंघ येतो. जागा वाढवणं तर सोडा, पण मागच्यावेळी ज्या जागा याठिकाणी काँग्रेसकडे होत्या, त्या टिकवणंही त्यांना शक्य झालं नाही. उत्तर प्रदेशच्या 80 जागांपैकी काँग्रेसला केवळ एका जागी म्हणजे रायबरेलीमध्ये सोनिया गांधी यांना विजय मिळवता आला.


लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर प्रियंका गांधी यांनी राजकारणात प्रवेश केला आणि लगेच त्यांना उत्तर प्रदेशचे महासचिव म्हणून नेमण्यात आलं. ज्या उत्तर प्रदेशातून दिल्लीचा मार्ग जातो, त्या उत्तर प्रदेशात भाजपला रोखण्याचं आव्हान प्रियंका गांधी यांच्याकडे होतं, मात्र हे आव्हान त्या पेलू शकल्या नाहीत. त्यांना वेळ कमी मिळाला ही बाब खरी आहे, मात्र त्यांचा करिश्मा किमान अमेठीत तरी चालायला हवा होता. मात्र तेही शक्य न झाल्यानं काँग्रेसची चिंता वाढली आहे.


उत्तर प्रदेशातच लक्ष केंद्रीय केल्यानं प्रियांका यांनी देशात इतर ठिकाणी फिरल्या नाहीत. मोठ्या सभा न करता रोड शो, कोपरा सभांवर त्यांचा भर अधिक होता. शेवटच्या टप्प्यात त्यांनी मंदिर वारीही केली. तरीही मतदारांना आपल्याकडे वळवण्यात त्यांना अपयश आलं.


राहुल गांधींच्या नेतृत्वावर सातत्यानं टीका होत होती, प्रियंका गांधी यांची पाटी कोरी होती. पण आता उत्तर प्रदेशातील या दारुण पराभवानं प्रियंका गांधी यांच्या पाटीवरही अपयशाचा डाग लागला आहे. राजकीय कारकिर्दीची सुरुवातच अपयशानं झाली. यातून सावरत उत्तर प्रदेशसारख्या राज्यात काँग्रेसला पाया रचून देण्याचं एक मोठं आव्हान त्यांच्यासमोर असणार आहे.


VIDEO | राहुल गांधींची काँग्रेस पक्षाध्यक्ष पदाच्या राजीनाम्याची तयारी | एबीपी माझा