गांधीनगर: गुजरातमधील भावनगर इथं ट्रक पलटून झालेल्या भीषण अपघातात, तब्बल 30 जणांचा मृत्यू झाला.  तर अनेक जण जखमी आहेत. धक्कादायक म्हणजे या ट्रकमध्ये तब्बल 70 वऱ्हाडी होते. लग्नासाठी हे वऱ्हाड निघालं होतं.


त्यावेळी मंगळवारी पहाटे भावनगर-राजकोट महामार्गावर रनघोलाजवळ ही दुर्घटना घडली. चालकाचा ताबा सुटल्याने ट्रक थेट नाल्यात कोसळला. या भीषण दुर्घटनेत 25 जणांनी जागीच प्राण गमावले.

या अपघातात जखमी झालेल्यांना  जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

चालकाला डुलकी लागल्याने, त्याने ट्रकवरील नियंत्रण गमावल्याचं सांगण्यात येत आहे.

दरम्यान, मृतांमध्ये अनेक महिला आणि मुलांचाही समावेश आहे. तसंच अनेक जखमींची स्थितीही चिंताजनक असल्याने मृतांचा आकडा वाढण्याची भितीआहे.

सध्या घटनास्थळी मोठ्या प्रमाणात बचावकार्य सुरु आहे.

पंतप्रधानांकडून शोक व्यक्त 

दरम्यान, या भीषण अपघातानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त केला. पंतप्रधान कार्यालयाने आपला शोकसंदेश  ट्विट करुन, मृतांच्या नातेवाईकांप्रती सहानुभूती व्यक्त केली.  "गुजरातमधील रनघोलाजवळ झालेल्या भीषण दुर्घटनेत ज्यांनी आपले स्वकीय गमावले, त्यांच्याप्रती मी संवेदना व्यक्त करतो. हा अपघात अत्यंत दुर्दैवी आणि गंभीर होता. या अपघातात जे जखमी झालेत, ते लवकरात लवकर बरे होवोत" असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे.