Arvind Kejriwal Attack on BJP: आम आदमी पक्षाचे नेते आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांनी गुजरातमध्ये मोठा दावा केला. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी (Sonia Gandhi) यांना भाजप (BJP) मागील दरवाजाने पंतप्रधान करण्याचा प्रयत्न करत असल्याचे केजरीवाल यांनी म्हटले. भाजपकडून आप (AAP) आणि मेधा पाटकर (Medha Patkar) यांच्याबाबत सुरू असलेल्या आरोपांना उत्तर देताना केजरीवाल यांनी हा दावा केला. 


येत्या काही महिन्यात  गुजरात विधानसभेच्या निवडणुका पार पडणार आहेत. आम आदमी पक्षाने गुजरात विधानसभा निवडणुकीसाठी जोर लावला आहे. काही महिन्यांपूर्वी सूरत व इतर शहरात झालेल्या पालिका व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आम आदमी पक्षाने लक्षणीय कामगिरी केली. काही ठिकाणी 'आप'ला काँग्रेसपेक्षा अधिक जागा, मतदान झाले. त्यानंतर आता आम आदमी पक्षाने गुजरातमध्ये जोर लावण्यास सुरुवात केली आहे. 


दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे सातत्याने गुजरातचा दौरा करत आहेत. अहमदाबादमध्ये पक्षाने आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी म्हटले की, मेधा पाटकर हे आम आदमी पक्षाकडून मुख्यमंत्रीपदाच्या चेहरा असतील का,असा प्रश्न विचारत आहेत. त्यावर माझे म्हणणे आहे की, नरेंद्र मोदी हे  सोनिया गांधी यांना पंतप्रधानपदाचे उमेदवार करण्यासाठी पडद्यामागून हालचाली करत आहेत. केजरीवाल यांनी काँग्रेसवरही जोरदार हल्ला केला. काँग्रेस आता संपली असून त्यांच्यावर प्रश्न विचारू नये असेही केजरीवाल यांनी म्हटले. 


गुजरातमध्ये भ्रष्टाचार आणि गुंडगिरी


अरविंद केजरीवाल यांनी म्हटले की,  मागील काही महिन्यांपासून मी गुजरातमध्ये फिरत असून लोकांशी संवाद साधत आहे. वकील, रिक्षा चालक, शेतकरी, व्यापाऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार असल्याचे म्हटले. शासकीय कार्यालयात कोणतेही काम करायचे असेल लाच द्यावी लागते. त्याविरोधात काही बोलले तर धमकी दिली जाते. व्यापारी आणि उद्योगपतींना छापा घालण्याची धमकी दिली जाते. गुजरातमध्ये मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार असून गुंडगिरी आहे. गुजरातमध्ये आम आदमी पक्षाची सत्ता आल्यास भ्रष्टाचार मुक्त आणि गुंडगिरी मुक्त सरकार देऊ असे केजरीवाल यांनी सांगितले. 


केजरीवाल यांच्याकडून आश्वासनांचा पाऊस


अरविंद केजरीवाल यांनी अनेक आश्वासने देत घोषणा केल्या आहेत. भ्रष्टाचारात आम आदमी पक्षाचा आमदार, मंत्री इतकंच काय मुख्यमंत्री जरी अडकला तर त्याला तुरुंगात धाडण्यात येईल. गुजरातच्या जनतेचा पैसा हा त्यांच्याच विकासासाठी वापरण्यात येईल. 'आप'चे  सरकार आल्यास कोणत्याही व्यक्तीचे शासकीय कार्यालयातील काम लाच न देता होईल. शासकीय योजनांसाठी, कामासाठी सरकार थेट तुमच्या घरी येईल. त्यासाठी शासकीय कार्यालयात जाण्याची आवश्यकता राहणार नाही, असेही केजरीवाल यांनी म्हटले. गुजरात सरकारच्या कार्यकाळातील सर्व घोटाळ्यांची चौकशी करण्यात येणार असल्याचे केजरीवाल यांनी म्हटले.