Gujarat News : गुजरातमध्ये (Gujarat) एका महिलेने आपल्याच मुलाची पोलिसात तक्रार केली. बेदरकारपणे (Rash Driving) दुचाकी चालवून अपघात झाल्याने महिलेने हे पाऊल उचललं. या अपघातात संबंधित महिला जखमी झाली. त्यामुळे संतापलेल्या महिलेने पोलीस स्टेशन गाठलं आणि मुलाविरोधात तक्रार दाखल केली
या घटनेत आई आणि मुलगा दोघेही जखमी झाले आहेत. गुजरातच्या नडियादमधील देगम पटेल फलियू इथली रहिवासी मीनाबेन पटेल (वय 58 वर्षे) यांनी आपला मुलगा आनंद याच्याविरुद्ध वासो पोलीस ठाण्यात रॅश ड्रायव्हिंगचा आरोप करत तक्रार दाखल केली. वारंवार बजावून देखील मुलगा आनंद पटेल बेदरकारपणे गाडी चालवत राहिला, परिणामी अपघात झाला, असं महिलेने आपल्या तक्रारीत म्हटलं आहे.
दुचाकी सावकाश चालवण्याच्या विनंतीकडे दुर्लक्ष आणि अपघात
मिळालेल्या माहितीनुसार, आठ महिन्यांपूर्वी मीनाबेन पटेल यांच्या पतीचं निधन झालं होतं. ती आपल्या 34 वर्षीय मुलगा आनंदसोबत राहते आणि त्याच्यावर अवलंबून आहे. आनंद पटेल हा एका खाजगी कंपनीत काम करतो. रविवारी (20 फेब्रुवारी) सकाळी तिला नडियादमध्ये कोणालातरी भेटायला जायचं होते. त्यामुळे तिने आनंदला तिला सोडण्यास सांगितलं. त्याच्या मोटारसायकलमध्ये बिघाड झाल्याने त्याने तिला सोडण्यासाठी त्याच्या मित्राची मोटारसायकल घेतली. मात्र, त्याने गाडीचे ब्रेक नीट तपासले नाहीत आणि हळूहळू जाण्याच्या आपच्या विनंतीकडे दुर्लक्ष करुन तो भरधाव वेगात दुचाकी चालवत होता. काही वेळाने, त्याने अचानक ब्रेक लावला, ज्यामुळे दुचाकी घसरली आणि दोघेही खाली पडले. या अपघातात आई आणि मुलगा दोघेही जखमी झाले आहेत.
महिलेच्या खांद्याला फ्रॅक्चर
यानंतर मीनाबेन पटेल यांना त्यांचा मुलगा आनंदने जवळच्या रुग्णालयात नेले. खांद्याला फ्रॅक्चर झाल्यामुळे तिथे त्यांच्यावर उपचार करण्यात आले. त्यानंतर संतापलेल्या मीनाबेन पटेल यांनी मुलगा आनंदविरुद्ध ओव्हरस्पीडिंगची तक्रार दाखल करण्याचा निर्णय घेतला.
मुलाच्या निष्काळजीपणामुळे अपघात : मीनाबेन पटेल
मीनाबेन पटेल यांनी तक्रारीत म्हटलं आहे की, "माझा मुलगा अतिशय वेगाने गाडी चालवत होता. त्याच्या निष्काळजीपणामुळे हा अपघात झाला ज्यामध्ये मी जखमी झाले. त्यामुळे मी त्याच्याविरुद्ध ही तक्रार दाखल करत आहे जेणेकरून या प्रकरणात कायदेशीर कारवाई केली जाईल."
मीनाबेन पटेल यांच्या तक्रारीनंतर वासो पोलिसांनी आनंद पटेल याच्याविरुद्ध IPC कलम 279 (रॅश ड्रायव्हिंग), 337 (इतरांच्या जीवाला किंवा वैयक्तिक सुरक्षेला धोका निर्माण करणाऱ्या कृत्याने दुखापत करणे) आणि 338 (इतरांच्या जीवाला किंवा वैयक्तिक सुरक्षेला धोका पोहोचवणाऱ्या कृत्याने गंभीर दुखापत करणे) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.