Sansad Ratna Award 2023: संसदरत्न पुरस्कार 2023 ची घोषणा करण्यात आली आहे. यंदाच्या पुरस्कार विजेत्यांमध्ये 13 खासदार, दोन संसदीय समितीचे सदस्य आणि एक जीवनगौरव पुरस्कार विजेत्यांचा समावेश आहे. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे माजी खासदार टी.के. रंगराजन यांना जीवनगौरव पुरस्कार जाहीर झाला आहे. तर, महाराष्ट्रातील लोकसभा खासदार भाजपचे गोपाळ शेट्टी, राष्ट्रवादी काँग्रेसचे डॉ. अमोल कोल्हे, भाजपच्या हिना गावित, राज्यसभेतील राष्ट्रवादीच्या खासदार फौजिया खान यांना संसदरत्न पुरस्कार झाला आहे.
भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांनी संसदरत्न पुरस्कार सुरू करण्याची सूचना केली होती. डॉ. अब्दुल कलाम यांच्या नावाने जीवनगौरव पुरस्कार दिला जातो.
जयंत सिन्हा यांच्या अध्यक्षतेखालील लोकसभेच्या अर्थविषयक संसदीय समिती आणि विजय साई रेड्डी यांच्या अध्यक्षतेखालील राज्यसभेच्या पर्यटन, वाहतूक आणि संस्कृतीविषयक स्थायी समितीलाही संसद रत्न पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.
केंद्रीय मंत्री अर्जुन राम मेघवाल यांच्या अध्यक्षतेखालील आणि माजी मुख्य निवडणूक आयुक्त एस कृष्णमूर्ती यांच्या सह-अध्यक्ष असलेल्या संसदेचे सदस्य आणि इतरांचा समावेश असलेल्या निवड समितीकडून संसदरत्न विजेत्यांची निवड केली जाते.
लोकसभेत कोणत्या खासदारांची निवड
लोकसभा खासदारांमध्ये काँग्रेसचे अधीर रंजन चौधरी, भाजपचे विद्युत बरन महतो, भाजपचे डॉ. सुकांत मजुमदार, काँग्रेसचे कुलदीप राय शर्मा, भाजप खासदार हिना विजयकुमार गावित, भाजपचे गोपाल शेट्टी, भाजपचे सुधीर गुप्ता आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे डॉ. अमोल कोल्हे यांना संसदरत्न पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.
राज्यसभेतून कोणत्या खासदारांची निवड
राज्यसभा खासदारांमध्ये मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे डॉ. जॉन ब्रिट्स, राष्ट्रीय जनता दलाचे मनोज झा, राष्ट्रवादी काँग्रेसच्या फौजिया खान, समाजवादी पक्षाचे विशंभर प्रसाद निषाद आणि काँग्रेसच्या छाया वर्मा यांना संसदरत्न पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.
मागील वर्षी कोणाला जाहीर झाले होते पुरस्कार
मागील वर्षी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे, केरळमधील रिवोल्यूशनरी सोशलिस्ट पार्टीचे एन.के. प्रेमचंद्रन आणि शिवसेनेचे खासदार श्रीरंग बारणे यांना त्यांच्या सातत्यपूर्ण उत्कृष्ट कामगिरीसाठी 'संसद विशिष्ट रत्न' पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.
तर, 17 व्या लोकसभेतील विविध श्रेणींमध्ये केलेल्या कामगिरीबद्दल सौगता रॉय (तृणमूल काँग्रेस, पश्चिम बंगाल), कुलदीप राय शर्मा (अंदमान आणि निकोबार बेटे), विद्युत बरन महतो (भाजप, झारखंड), हिना विजयकुमार गावित (भाजप, महाराष्ट्र) आणि सुधीर गुप्ता (भाजप, मध्य प्रदेश) 'संसद रत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.