Gujarat Crime News: नवसारी : आजी, आजोबा आणि नातवंडांचं नातं काही वेगळंच असतं. आजी-आजोबांसाठी आपलं नातवंड जीव की प्राण असतं. याचा प्रत्यय गुजरातमधील (Gujarat) एका हृदयद्रावक घटनेतून नक्कीच येईल. गुजरातमधील नवसारीत (Navsari News) एक धक्कादायक घटना घडली. एका तरुणाचा मृत्यू झाला. तरुणाच्या मृत्यूची बातमी समजताच वृद्ध आजीला मोठा धक्का बसला. पुढच्या काही क्षणांतच आजीनंही आपले प्राण सोडले. आजीनं यावेळी उच्चारलेले काही शब्द सर्वांच्या काळजाचा ठोका चुकवून गेले. कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार, जेव्हा आजीला तिच्या नातवाच्या निधनाचं वृत्त समजलं, त्यावेळी ती धामोकलून रडू लागली. त्यानंतर आजी म्हणाली, "बाळा, तुझी सेवा करण्यासाठी मी तुझ्याजवळ येतेय." त्यानंतर आजीनं डोळे मिटले आणि आपला जीव सोडला.
दरम्यान, ही हृदयद्रावक घटना गुजरातमधील नवसारी येथे घडली आहे. येथील विजलपूर नगरपालिकेतील नगरसेवकआणि माजी कार्याध्यक्ष अश्विन कासुंदरा हे अनेक दिवसांपासून आजारी होते. अश्विनचा 5 फेब्रुवारीला संध्याकाळी मृत्यू झाला. आजी लक्ष्मीबेन यांच्या मोरबी गावात त्या राहत होत्या. आजी लक्ष्मीबेन यांना नातवाच्या मृत्यूची बातमी कळताच त्यांना धक्काच बसला.
"नातवाच्या अंत्यसंस्कारानंतर आजीला सांगितलं"
आजी म्हणाली की, बाळा मी तुझी सेवा करण्यासाठी येतेय आणि तिथेच आजीनं आपले प्राण सोडले. नातेवाईक सांगतात की, आजी लक्ष्मीबेन यांचं वय जास्त होतं. अश्विन कासुंदरा यांच्या मृत्यूनंतर त्यांचे अंत्यसंस्कार करण्यात आले, त्यानंतर त्यांच्या आजीला दुःखद वृत्त देण्यात आलं.
"कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला"
आजीला आपल्या नातवाचं निधन झाल्याचं कळताच ती रडू लागली आणि तिला मोठा धक्का बसला. पुढच्या काही वेळातच आजी लक्ष्मीबेन यांचा मृत्यू झाला. स्थानिक लोकांनी दिलेल्या माहितीनुसार, कसुदरा कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. आधी तरुण मुलाचा आजारानं मृत्यू झाला आणि त्यानंतर आजीनं आपला जीव सोडला.
"नातवानंतर आजीच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार"
सोमवारी नातू अश्विन कासुंद्रावर अंत्यसंस्कार करण्यात आल्याचं कुटुंबीयांचं म्हणणं आहे. आता आजी लक्ष्मीबेन यांच्या पार्थिवावर मंगळवारी अंत्यसंस्कार होणार आहेत. या कुटुंबाचं सांत्वन करण्यासाठी आसपासच्या भागातील लोक येत आहेत.
नगरसेवक म्हणून काम करताना अश्विन कासुंदरा हे शहरातील सर्व जनतेचे आवडते नेते होते, असे स्थानिकांचे म्हणणे आहे. तो कुटुंबातील सर्वात लाडका मुलगा देखील होता. नातू अश्विनच्या आजारपणामुळे आजी लक्ष्मीबेन खूप दुःखी होत्या आणि खूप काळजीतही होत्या. मध्य प्रदेशचे राज्यपाल मंगूभाई पटेल यांनीही अश्विनच्या नवसारीतील अंतयात्रेला हजेरी लावली होती.