सर्व विद्यार्थ्यांचं वय 15 ते 22 वर्षांपर्यंत होतं. या दुर्घटनेत 11 विद्यार्थी गंभीर जखमी झाले असून त्यांना जवळच्याच रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. दुर्घटनेच्या वेळी आर्ट्स कोचिंग क्लासमध्ये 40 ते 45 विद्यार्थी आणि शिक्षक होते. पोलिसांनी गुन्ह्याची नोंद केली आहे.
तक्षशिला कॉम्प्लेक्स या इमारतीमध्ये अनेक दुकानं आणि कोचिंग सेंटर आहेत. शुक्रवारी (24 मे) इमारतीच्या चौथ्या मजल्यावर कोचिंग क्लास सुरु होता. त्याचवेळी इमारतीमध्ये आग लागली. आगीत 20 जणांचा होरपळून मृत्यू झाला तर जीव वाचवण्यासाठी एका विद्यार्थ्याने चौथ्या मजल्यावरुन उडी मारली, ज्यात त्याचा अंत झाला.
या दुर्दैवी घटनेनंतर प्रशासनाने कठोर कारवाई करत 24 जुलैपर्यंत रहिवासी आणि कमर्शिअल परिसरात सुरु असलेले कोचिंग क्लास बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.
शॉर्ट सर्किटमुळे आग
आगीचं नेमकं कारण अद्याप समजू शकलेलं नसलं तरी शॉर्ट सर्किटमुळे आग लागली असावी, असं म्हटलं जात आहे.इमारतीखाली असलेल्या ट्रान्सफॉर्मरला आधी आग लागली. यानंतर आग बॅनरपर्यंत पोहोचली आणि इमारतीमध्ये पसरली. इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर लाकडाची शिडी होती. आगीमुळे ती पूर्णत: खाक झाली. त्यामुळे चौथ्या मजल्यावरील विद्यार्थी खाली उतरु शकले नाहीत आणि दुर्घटनेत बळी पडले. अग्निशमन दलाच्या 18 गाड्यांच्या मदतीने आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलं.
मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी चार लाखांची नुकसान भरपाई
या दुर्घटनेनंतर गुजरातच्या मुख्यमंत्री कार्यालय परिपत्रक जारी करुन म्हटलं आहे की, "मुख्यमंत्री विजय रुपाणी यांनी आगीच्या दुर्घटनेच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. मुख्यमंत्र्यानी घटनेत मृत पावलेल्या प्रत्येक विद्यार्थ्याच्या कुटुंबीयांना चार लाख रुपयांची आर्थिक मदत देण्याची घोषणा केली आहे."
पंतप्रधानांकडून मदती पुरवण्याचे आदेश
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही या दुर्घटनेबद्दल दु:ख व्यक्त केलं आहे. "सूरतमधील घटनेनंतर मी दु:खी असून माझ्या संवेदना मृतांच्या कुटुंबियासोबत आहेत. घटनेत जखमी झालेले लवकर ठीक होवोत, यासाठी अशी मी प्रार्थना करतो. गुजरात सरकार आणि स्थानिक प्रशासनाने पीडितांना तातडीने मदत पुरवावी अशा सूचना दिल्या आहेत", असं ट्वीट नरेंद्र मोदींनी केलं आहे.
राहुल गांधींकडूनही शोक व्यक्त
दुसरीकडे काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनीही सूरतमधील दुर्घटनेवर दु:ख व्यक्त केलं आहे. त्यांनी ट्वीटमध्ये म्हटलं आहे की, "दुर्घटनेच्या वृत्ताने अतिशय दु:ख झालं. मृत कुटुंबाप्रति मी शोक आणि सांत्वन व्यक्त करतो."