Gujarat, HP Election 2022 Dates: केंद्रीय निवडणूक आयोगाची (Election Commission Of India) आज दुपारी पत्रकार परिषद होणार आहे. या पत्रकार परिषदेत हिमाचल प्रदेश (Himachal Pradesh) आणि गुजरातमधील (Gujarat) निवडणुकीची घोषणा होण्याची शक्यता आहे. मागील काही दिवसांपासून हिमाचल प्रदेश आणि गुजरातमध्ये राजकीय पक्षांनी सभांचा धडाका लावला आहे. त्यामुळे आज होणाऱ्या निवडणूक आयोगाच्या पत्रकार परिषदेकडे अनेकांचे लक्ष लागले आहे. 


केंद्रीय निवडणूक आयोगाने  आज दुपारी तीन वाजता पत्रकार परिषद आयोजित केली आहे. 


 






हिमाचल प्रदेश आणि गुजरातमध्ये भाजपच्या नेतृत्वातील सरकार आहे. दोन्ही राज्यात भाजप विरोधात काँग्रेस अशी लढत आहे. मात्र, गुजरातमध्ये आम आदमी पक्षाच्या कामगिरीकडेही अनेकांचे लक्ष लागले आहे. 


गुजरातमध्ये काय होणार?


गुजरातमध्ये मागील 27 वर्षांपासून भाजपच्या नेतृत्त्वात सरकार आहे. मागील विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने भाजपला कडवी झुंज दिली. काही मतदारसंघात उमेदवारांचा थोडक्यात पराभव झाल्याने काँग्रेस सत्तेपासून दूर राहिली. त्यानंतर भाजपने काँग्रेसने काही आमदार फोडले. काही महिन्यांपूर्वी पाटीदार नेता आणि काँग्रेसचे कार्यकारी प्रदेशाध्यक्ष हार्दिक पटेल यांनी भाजपात प्रवेश केला होता. तर, दुसरीकडे काही महिन्यांपूर्वीच झालेल्या काही महापालिका निवडणुकीत काँग्रेसला मोठा धक्का बसला. भाजपने या निवडणुकांत निर्विवाद यश मिळवले तरी आम आदमी पक्षाने लक्षणीय कामगिरी केली. काँग्रेस थेट तिसऱ्या क्रमांकावर गेली. 


हिमाचलमध्ये सत्ता बदल होणार?


वर्ष 2017 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपने 45 जागांवर विजय मिळाला. तर, काँग्रेसला 20 जागांवर विजय मिळाला. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने एका जागेवर विजय मिळवला होता. तर, अपक्ष दोन ठिकाणी विजयी झाले होते. भाजपकडून सत्ता खेचण्यासाठी काँग्रेसकडून प्रयत्न  आहेत. काही महिन्यांपूर्वी झालेल्या पोटनिवडणुकीत काँग्रेसला यश मिळाले होते. त्यामुळे काँग्रेसचा आत्मविश्वास दुणावला आहे. मात्र, काही महिन्यापूर्वी काँग्रेस आमदार पवन कुमार काजल आणि लखविंदर सिंह राणा यांनी भाजपात प्रवेश केला. त्यामुळे काँग्रेसला मोठा धक्का बसला.