नवी दिल्ली: केंद्रीय निवडणूक आयोगाने आज गुजरात विधानसभेच्या निवडणुकीच्या तारखा जाहीर केल्या.

गुजरातमध्ये दोन टप्प्यात मतदान होणार आहे.  येत्या 9 आणि 14 डिसेंबरला मतदान होईल. तर 18 डिसेंबरला निकाल जाहीर होईल. त्यासाठी आजपासून आचारसंहिता सुरु झाली.

यंदाच्या गुजरात निवडणुकीचं वैशिष्ट्य म्हणजे, यावेळी व्होटर व्हेरीफाईड पेपर ऑडिट ट्रेल अर्थात व्हीव्हीपॅट मशिनचा वापर करण्यात येणार आहे.



यापूर्वी नांदेड महापालिकेत प्रायोगिक तत्वावर व्हीव्हीपॅट मशिन वापरण्यात आलं होतं.

व्हीव्हीपॅट मशिन काम कसं करतं?

व्हीव्हीपॅट अर्थात व्होटर व्हेरीफाईड पेपर ऑडिट ट्रेल. मतदार जेव्हा एखाद्या उमेदवाराला मतदान करण्यासाठी त्याच्या चिन्हापुढील बटण दाबतो, त्यावेळी व्हीव्हीपॅट मशिनवरील स्क्रीनवर ज्या उमेदवारच्या नावापुढील बटण दाबले गेले, त्याचे नाव आणि चिन्हाची प्रिंट निघते. मतदाराला स्क्रीनवर काही सेकंद ही प्रिंट स्पष्ट दिसते आणि मग ही प्रिंट व्हीव्हीपॅट मशिनमधील डब्यात जाऊन पडते.

अशा पद्धतीने मतदारला मतदान कुणाला केले आणि कुणाला झाले याचा पुरावा बघायला मिळतो.

शिवाय मशिनमधील आकडे आणि प्रिंटचे आकडे समान आल्यास, ईव्हीएममध्ये घोटाळा झाला नाही हे सिद्ध होईल.

निकाल लांबण्याची शक्यता

व्हीव्हीपॅट मशिनच्या वापरामुळे गुजरातचा निकाल लांबण्याची शक्यता आहे. कारण ईव्हीएम मधील मतं आणि व्हीव्हीपॅटमधील मतपत्रिका हे क्रॉसचेक कराव्या लागतील.

जर कोणी फेरमतमोजणीची मागणी केली, तर मतपत्रिका मोजण्याचं मोठं काम अधिकाऱ्यांना करावं लागेल, त्यासाठी वेळ जाण्याची शक्यता आहे.

संबंधित बातम्या

गुजरात निवडणूक 2017 : तारखा जाहीर, दोन टप्प्यात मतदान

तुमचं मत कुणाला गेलं? नांदेड मनपा निवडणुकीत व्हीव्हीपॅट मशिनचा वापर